नवी दिल्ली – केंद्रीय तपास संस्था राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) टेरर फंडिंग प्रकरणात मोठा दावा केला आहे. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडून (Dawood Ibrahim) पैसे पाठवण्यात येत होते. त्यासाठी हवाला मार्गाचा (Hawala Route) वापर दाऊदकडून करण्यात आला. मागील चार वर्षांत हवालाद्वारे दहशतवादी कारवायांसाठी (Terrorist Activities) सुमारे १२ ते १३ कोटी रुपये दाऊदने भारतात पाठवल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.
दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक मदतीबाबत (Financial Help) केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या तपासादरम्यान तपास यंत्रणांनी काहींना अटक केली असून चौकशीदेखील सुरू आहे. त्यातून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने हवाला रॅकेटचा वापर करून दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवला असल्याचे समोर आले आहे. दाऊद इब्राहिमने दहशतवादी कारवायांसाठी मुंबईत २५ लाख रुपये पाठवले होते.
मुंबईत दहशतवादी कारवाया आणि मोठे हल्ले घडवण्यासाठी दाऊद इब्राहिमसह त्याचा साथीदार छोटा शकीलने दुबईमार्गे पाकिस्तानातून २५ लाख रुपये पाठवले. हा पैसा सुरतमधून भारतात आला होता. त्यानंतर तेथून मुंबईला पोहोचला होता. हे पैसे हवालाद्वारे आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांच्यापर्यंत पोहोचवले गेले.
मागील चार वर्षात हवालाद्वारे दहशतवादी निधीसाठी जवळपास १२ ते १३ कोटी रुपये भारतात पाठवण्यात आले असल्याचे एनआयएने म्हटले आहे. पाकिस्तानातून भारतात आणलेले २५ लाख रुपये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाठवण्यात आले होते असेही एनआयएने आरोपपत्रात म्हटले. शब्बीरने ५ लाख रुपये ठेवले होते आणि उर्वरित रक्कम एका साक्षीदारासमोर आरिफला दिली होती. शब्बीरच्या घराची ९ मे २०२२ रोजी झडती घेतली असता त्याच्याकडून ५ लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे एनआयएने म्हटले आहे.