ऑपरेशन सिंदूरनंतर जैश-ए-मोहम्मद पुन्हा सक्रिय! पाकिस्तानात ३१३ नवे तळ उभारण्याची योजना, अब्जावधी रुपयांचा निधी संकलन सुरू ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Operation Sindoor : मे २०२५ मध्ये भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अनेक तळ उद्ध्वस्त झाले. जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात दहशतीचे सावट पसरवणाऱ्या जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेला या कारवाईत मोठा फटका बसला होता. मात्र, आता या संघटनेने पुन्हा डोके वर काढण्याची तयारी सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार, जैश प्रमुख मसूद अझहर आणि त्याचा भाऊ तल्हा अल सैफ यांनी पाकिस्तानभरात तब्बल ३१३ नवीन दहशतवादी तळ (मरकझ) उभारण्याची योजना आखली आहे. हे तळ फक्त नव्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नव्हे तर अझहर व त्याच्या कुटुंबासाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणूनही वापरले जाणार आहेत. यासाठी तब्बल ३.९१ अब्ज पाकिस्तानी रुपये उभारण्याचा टार्गेट ठेवण्यात आला आहे.
निधी उभारणीसाठी जैश-ए-मोहम्मदने पारंपरिक मार्गाऐवजी आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. इझीपैसा आणि सदापे सारख्या पाकिस्तानी डिजिटल वॉलेट्सचा वापर करून ऑनलाइन डोनेशन गोळा केले जात आहेत. इतकेच नव्हे, तर मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळीही देणग्या मागितल्या जात आहेत. काही ठिकाणी गाझातील मानवी मदतीच्या नावाखाली निधी उभारला जात आहे; मात्र हा पैसा प्रत्यक्षात दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातोय.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
तपासादरम्यान गुप्तचर संस्थांना जैशशी जोडलेल्या कोऱ्या देणगी पावत्या मिळाल्या. त्यातून समजले की जमा झालेला पैसा अनेक पाकिस्तानी डिजिटल खात्यांत वळवला जात आहे. यातील एक सदापे खाते मसूद अझहरचा भाऊ तल्हा अल सैफ याच्या नावावर असून, त्याच्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक हरिपूर जिल्ह्यातील जैश कमांडर आफताब अहमदच्या नावावर नोंदवलेला आहे. या कमांडरचा पत्ता थेट जैशच्या छावणीशी जोडलेला असल्याचे पुरावेही समोर आले आहेत.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खातमा केला, तसेच बहावलपूरसह अनेक महत्त्वाचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र, जैशची पुनर्रचना सुरू झाल्यास सीमापार दहशतवाद पुन्हा डोके वर काढू शकतो.
विशेषत: काश्मीर खोऱ्यात शांततेच्या प्रक्रियेवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणेसाठी हा नवीन धोका आणि आव्हान ठरणार आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचे प्राण गेले. त्याचा प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी मे महिन्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. पाकिस्तान आणि पीओकेमधील अनेक लाँच पॅड्स, बंकर आणि दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यातून पाकिस्तानला मोठा फटका बसला होता. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच पुन्हा संघटनेने आपली ताकद उभी करण्याचे षड्यंत्र रचल्याने हा प्रश्न केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही. हा प्रकार पाकिस्तानातील राजकीय व्यवस्थेवर, तेथील अर्थव्यवस्थेवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही गंभीर परिणाम करणारा ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
जैश-ए-मोहम्मदचे हे हालचाली भारतासाठी इशारा आहेत. दहशतवादाचा फडशा पाडण्यासाठी केवळ लष्करी कारवाई पुरेशी नसून, सायबर वॉरफेअर, आर्थिक मार्गांचे बंधन आणि आंतरराष्ट्रीय दबाव हे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत. भारताने या नव्या संकटावर लक्ष ठेवत कठोर पावले उचलली नाहीत, तर काश्मीरमध्ये पुन्हा दहशतीची छाया गडद होण्याची भीती व्यक्त केली जाते.