
(
दिल्ली: नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध ‘Money Heist’ या वेब सीरिजपासून प्रेरणा घेत एका टोळीने तब्बल 150 कोटी रुपयांची मोठी सायबर फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. दिल्ली पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली असून, या गँगने ‘प्रोफेसर’, ‘अमांडा’, ‘फ्रेडी’ अशी सीरिजमधील पात्रांची नावं वापरून लोकांना जाळ्यात ओढलं होतं.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी अर्पित हा व्यवसायाने वकील असून त्याने स्वत:ला ‘प्रोफेसर’ म्हणून सादर केलं. तर कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केलेला प्रभात वाजपेयी ‘अमांडा’ बनला आणि अब्बासने ‘फ्रेडी’ हे नाव घेतलं. त्यांनी सोशल मीडियावर आणि WhatsApp वर अनेक गुप्त ग्रुप्स तयार केले. या ग्रुप्समध्ये त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीबद्दल टिप्स आणि सल्ले देत लोकांचा विश्वास संपादन केला.
सुरुवातीला छोट्या गुंतवणुकीवर थोडा नफा देऊन त्यांनी विश्वास निर्माण केला, आणि मग लोकांना मोठ्या रकमेसाठी प्रवृत्त केलं. मोठी रक्कम मिळताच, गुंतवणूकदारांचे अकाउंट्स ब्लॉक करून त्यांनी पैसे लंपास केले. एवढंच नाही, पैसे परत मागितल्यास लोकांना धमक्या देण्यात आल्या आणि आणखी पैसे जमा करण्यास भाग पाडण्यात आलं.
या टोळीने देशभरातील 300 हून अधिक लोकांना फसवून, 150 कोटींपेक्षा जास्त रक्कम लुबाडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी लक्झरी हॉटेल्समध्ये राहून, मोबाईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून संपूर्ण घोटाळा चालवत होते.
तपासादरम्यान पोलिसांना या फसवणुकीचा चायना कनेक्शन असल्याचा संशय आला आहे. कॉल रेकॉर्ड आणि इंटरनेट लॉग्जमधून या फसवणुकीचे धागेदोरे नोएडा आणि गुवाहाटीपर्यंत पोहोचले आहेत. परदेशातून कार्यरत काही चायनीज फसवणूकदारांचे नेटवर्क या घोटाळ्यामागे असल्याचं पोलिसांना वाटतं.
पोलिसांनी उत्तर प्रदेशातील नोएडा आणि पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे छापे टाकून 11 मोबाईल फोन्स, 17 सिम कार्ड्स, 12 बँक पासबुक्स, 32 डेबिट कार्ड्स आणि अनेक ऑनलाइन ट्रान्झॅक्शन्सचे स्क्रीनशॉट्स जप्त केले आहेत. सध्या पोलिस गँगच्या उर्वरित सदस्यांचा आणि त्यांच्या परदेशी संपर्कांचा शोध घेत आहेत.