दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तीव्र विरोधानंतर अखेर आली जाग; आता डिपॉझिट न भरताच उपचार
पुणे : पुण्यामधील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैसे भरण्याची मागणी केल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाकडून गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून दहा लाखांची मागणी केली. पैसे वेळेत न दिल्यामुळे रुग्णालयाने उपचार न दिल्यामुळे तनिषा भिसे यांचा दोन जुळ्या मुलांना जन्म देताना मृत्यू झाला असल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केला आहे. यामुळे पुण्यासह राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे.
मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने भिसे कुटुंबियांचे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणामुळे रुग्णालयाच्या बाहेर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते रुग्णालयाबाहेर जोरदार आंदोलन करत आहेत. या प्रकरणावरुन राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात असून कारवाईची मागणी केली जात आहे. आंदोलनकर्त्यांनी डॉक्टरांच्या अंगावर चिल्लर देखील फेकली आहे. या परिस्थितीनंतर आता दीनानाथ रुग्णालय जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दीनानाथ रुग्णालय जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी रुग्णालयाच्या वतीने या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ते म्हणाले की, “या प्रकरणाचा पूर्ण अहवाल आम्ही शासनाकडे पाठवला आहे. प्रोसेस चालू आहे. शासनाला हवी असलेली माहिती दिल्याशिवाय याविषयी आता आम्हाला काही बोलता येणार नाही. हा विषय पूर्ण गुंतागुंतीचा आहे, शासनाला माहिती दिल्यानंतर पूर्ण माहिती माध्यमांना देण्यात येईल. जी माहिती आलेली आहे ती अर्धवट आणि दिशाभूल करणारी आहे. रुग्णालयाची भूमिका लवकरच स्पष्ट केली जाईल,” असे स्पष्ट मत दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी मांडले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने तनिषा भिसे पैशांच्या हव्यसापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐन वेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. प्रसूती वेदना तीव्र झाल्याने, महिलेला खाजगी गाडीने २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिने जुळ्या मुलींना जन्म दिला, पण वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत बिघडली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, गर्भवती महिलेचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयाबाहेर ठाकरे गट व शिंदे गटाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.