
मूल-चिचाळा रस्त्यावर भीषण अपघात; कार-दुचाकीमध्ये जोरदार धडक, दोघांचा मृत्यू
चंद्रपूर : चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील थेरगाव येथे भीषण अपघात झाला. कार आणि दुचाकी या वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. थेरगाव येथे जात असलेल्या दुचाकीस्वारांना ताडाळाकडून मूलकडे येत असलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिली. यात दोन जण जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. ११) दुपारी घडली.
मुन्ना पोरते (वय ३५) व अनिल मडावी (३७, रा. थेरगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. मूल तालुक्यातील थेरगाव येथील मुन्ना व अनिल हे मूल येथे काही कामानिमित्त दुचाकीने (एमएच-३४/ बीपी-९०३५) आले होते. काम करून परत जात असताना मूल-चिचाळा मार्गावरील महाबीज केंद्राजवळ चारचाकी वाहनाने (एमएच-३४/बीझेड-३३२३) त्यांना जबर धडक दिली. यात दुचाकी चालक व वाहक जागीच ठार झाले. चारचाकी चालक आपले वाहन घटनास्थळावरून घेऊन पसार झाले. या घटनेची माहिती मूल पोलिस ठाणे येथे मिळताच पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला.
हेदेखील वाचा : Accident News : अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात, ट्रक दरीत कोसळून 22 कामगारांचा मृत्यू
दरम्यान, यातील दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. मूल पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने चारचाकी वाहनाचा शोध घेतला. वाहन जप्त करण्यास पोलिसांना काही वेळातच यश आले आहे. मूल पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय राठोड, सहायक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अंमलदार केळझरकर करीत आहे.
ट्रक कोसळला खोल दरीत
दुसऱ्या एका घटनते, अरुणाचल प्रदेशच्या अंजाव जिल्ह्यात गुरुवारी (दि. 11) एक भयानक रस्ता अपघात झाला. चकलागम परिसरात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक डोंगरावरून खोल दरीत कोसळला. त्यात एकूण २२ कामगार होते, त्यात सर्वांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, यापैकी १९ कामगार आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील गिलापुकुरी टी इस्टेटचे रहिवासी होते. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत १३ कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित कामगारांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे.
आसाममधील १९ कामगारांचा मृत्यू
पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढले आहेत. नऊ जणांचा शोध अजूनही सुरू आहे. आतापर्यंत १९ कामगारांची ओळख पटली आहे. बुधेश्वर दीप, राहुल कुमार, समीर दीप, जॉन कुमार, पंकज माणकी, अजय माणकी, विजय कुमार, अभय भूमिज, रोहित माणकी, बिरेंद्र कुमार, अगर तातीची, धीरेन चेतिया, रजनी नाग, दीप गौला, रामचबक सोनार, सोनातन नाग, संजय कुमार, करण कुमार आणि जोनास मुंडा. सर्व १९ कामगार आसाममधील तिनसुकिया येथील गेलापुखुरी टी इस्टेटचे रहिवासी होते.