
मालवाहू ट्रक नाल्यात कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू
सातारा : सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने एक मालवाहू ट्रक संरक्षक कठडा तोडून रस्त्यालगतच्या खोल नाल्यात कोसळला. या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून, चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रक हा रोहा येथून साताऱ्याच्या दिशेने जात होता. केळघर घाटातील मुकवली माची येथील एका धोकादायक वळणावर गुरुवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक थेट रस्त्याशेजारील संरक्षक कठडा तोडून खाली नाल्यात कोसळला.
हेदेखील वाचा : बाप की हैवान! डोळे काढण्याचा प्रयत्न अन् शरीरावर अनेक जखमा, 12 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, हत्येचा व्हिडीओ पाठवला आईला
या भीषण अपघातात ट्रकचालक अजिनाथ नागरगोजे (वय अंदाजे ३२, रा. यवनवाडी, जि. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि रेस्क्यू टीमच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस व बचाव पथकाने क्रेनच्या साहाय्याने मोठ्या प्रयत्नानंतर ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले; मात्र तपासणीअंती त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.
यापूर्वीही झाले मोठे अपघात
केळघर घाटातील धोकादायक वळणांमुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, या मार्गावर अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
खेड तालुक्यातही भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ वाशिष्टी डेरी परिसरात दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा २९ जानेवारी २०२६ रोजी दु. ११.२५ च्या सुमारास घडला. प्राप्त माहितीनुसार, दुचाकी क्र. एमएच ०८ एन ६२४६ ही दुचाकी मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
हेदेखील वाचा : Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकींचा अपघात;एक गंभीर जखमी तर…