'खुनाचा बदला खुनाने' घेण्याचा प्रयत्न फसला; शिरवळमध्ये भरदिवसा गोळीबार, दुचाकीवरून दोघे आले अन्...
शिरवळ : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शिरवळमध्ये धक्कादायक घटना घडली. भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी रियाज उर्फ मन्या इकबाल शेख (वय ४०) याच्यावर भर रस्त्यावर गोळीबार केला. या गोळीबारात रियाज शेख हा किरकोळ जखमी झाला असून, हल्लेखोर फरार झाले आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे भरदिवसा झालेल्या गोळीबाराने परिसरात मोठी खळबळ उडाली. शासकीय विश्रामगृहासमोरील मेनरोडवर झालेल्या या घटनेत रियाज हा युवक किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये साई धुमाळ, अक्षय उर्फ प्रेम वसगडेकर, अविनाश मोरे, रॉकी हरिदास बाला, सनी टापरे व रोहन गुजर (सर्व राहणार शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) यांचा समावेश आहे.
फिर्यादी रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख (वय ४०, रा. व्हाईट हाऊस, बाजारपेठ, शिरवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार , २०१६ साली झालेल्या खुनाच्या प्रकरणाचा राग मनात धरून साई धुमाळ व अक्षय वसगडेकर यांनी दुचाकीवरून येत रियाज उर्फ मिन्या शेख याच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. यावेळी अविनाश मोरे, रॉकी हरिदास बाला, सनी टापरे व रोहन गुजर या संशयित आरोपींनी रियाजच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याला ठार मारण्याचा कट रचला होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रियाज उर्फ मिन्या शेख हा संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मेनरोडवरील शासकीय विश्रामगृहाजवळ मित्राशी बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या साई धुमाळ व अक्षय वसगडेकर यांनी थेट त्याच्यावर गोळीबार केला. गोळी झटापटीत सुटून त्याच्या उजव्या हाताला लागली. त्यानंतर मिन्या शेख घटनास्थळावरून बाजूला सरकताच हल्लेखोरांनी त्याचा काही अंतरावर पाठलाग करून पुन्हा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून पलायन केले.
या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, शिरवळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत नलावडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे करत आहेत.