माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडीसह अटक
नागपूर : शहर अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी कंबर कसली आहे. जवळपास दररोजच अमली पदार्थांची तस्करी, विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यातच गणेशपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर रविवारी रात्री बस स्थानक परिसरातून एका एमडी विक्रेत्याला अटक केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची झडती घेतली असता त्याच्याजवळ 1.68 लाख रुपये किंमतीची 16.07 ग्रॅम एमडी मिळाली. चौकशीत तो दक्षिण नागपूरचा माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा संकेत बुग्गेवार (वय 29, रा. आशिर्वादनगर) असून बॉडी बिल्डिंगसाठी प्रोटीन पावडरसोबत ड्रग्ज घेत होता आणि त्याची विक्रीही करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. पोलिसांनी संकेतजवळून एमडी आणि कारसह एकूण 18.17 लाख रुपयांचा माल जप्त केला. संकेतचा साथीदार प्रणय बाजारे हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
हेदेखील वाचा : Praveen Gaikwad Attack News: प्रविण गायकवाडांवर हल्ला करणारा भाजपचा निकटवर्तीय : सुषमा अंधारे आक्रमक, बावनकुळेंचे स्पष्टीकरण
संकेतचे वडील अजय बुग्गेवार हे भारतीय जनता पक्षाचे सक्रीय कार्यकर्ता आहेत. पूर्वी ते प्रभाग 30 चे नगरसेवक होते. संकेतला बॉडी बिल्डिंगची आवड आहे. त्यासाठी दिवसरात्र तो जिममध्ये व्यायाम करतो. वाईट संगतीमुळे तो नशेच्या आहारी गेला. त्याने एमडीचे सेवन सुरू केले. आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी तो अमली पदार्थांच्या विक्रीकडे वळला. रविवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास गणेशपेठ पोलिसांचे पथक ठाण्यांतर्गत गस्त घालत होते.
या दरम्यान एक युवक एमएच-45/एव्ही-4554 क्रमांकाच्या जीपमधून अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. वाहन दिसताच अडविण्यात आले. वाहनामध्ये असलेल्या संकेतला खाली उतरवून झडती घेतली असता त्याच्याजवळ चार पिशव्यांमध्ये 16.05 ग्रॅम एमडी मिळाले.
मित्रासोबत मिळून ड्रग्जचा व्यवसाय
आशीर्वादनगर परिसरात राहणारा मित्र प्रणय बाजारे (वय 25) याच्यासोबत मिळून ड्रग्जचा व्यवसाय करतो. त्याला ड्रग्ज प्रणय यानेच उपलब्ध केले होते. पोलिसांनी दोघांविरुद्धही एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलिस प्रणयचा शोध घेत आहेत. रविवारी पोलिसांनी संकेतला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 15 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.