जुन्या वादातून ठेकेदारावर केला प्राणघातक हल्ला
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता संभाजीनगरमध्ये गल्लीतील जुन्या वादातून बांधकाम ठेकेदारावर चौघांनी कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली.
राहुल भानुदास दाभाडे (वय ४०), यश राहुल दाभाडे, प्रमोद (यशचा मावस भाऊ), व लक्ष्मी राहुल दाभाडे अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहे. त्यांच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात राजू नामदेव निकाळजे (वय ३६, रा. मिलिंदनगर, उस्मानपुरा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हे बांधकाम ठेकेदार आहेत. २ जून रोजी रात्री ८ वाजता ते त्यांच्या कुटुंबासोबत घरी होते. त्याचवेळी गल्लीतील रहिवासी राहुल दाभाडे याने त्यांना इकडे ये म्हणून बोलावले. त्यावेळी त्यांची पत्नी, आई व भावजई यांच्यासोबत ते त्याच्याकडे गेले.
त्यावेळी नामदेव यांनी राहुल व त्याच्या कुटुंबीयांना विचारले, माझ्या गैरहजेरीत माझ्या कामाचे नुकसान का केले? गज का चोरला? याच मुद्द्यावरून दोघांत पोलिस ठाण्यामध्ये वाद झाला होता.त्याच रागातून राहुल, यश, प्रमोद व लक्ष्मी दाभाडे यांनी गल्लीमध्ये त्यांच्याशी पुन्हा वाद घालून शिवीगाळ व धमकी दिली.
दरम्यान, या वादानंतर नामदेव हे कुटुंबासह घरी परतले असताना यश दाभाडेने हातातील कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर अचानक वार केला. त्याचवेळी प्रमोदने डाव्या हातावर लोखंडी हातोडीने वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. प्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.२) रात्री ८ वाजेच्या सुमारास मिलिंदनगर परिसरात घडली.