Pimpri Crime : काळेवाडीत सात जणांच्या टोळक्याचा राडा; आधी दोघांवर कोयत्याने वार केले अन् नंतर...
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे प्रकार घडत आहेत. असे असताना आता पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काळेवाडीच्या जीवन चौकात सात जणांच्या टोळक्याने राडा घातला. या टोळक्याने दहशत निर्माण करत दोघांवर कोयत्याने खुनी हल्ला केला.
टोळक्याने केलेल्या या हल्ल्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सातही आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी ऋतुराज प्रमोद निकम (वय १९, रा. काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिषेक श्यामराव निंबाळकर (वय २१), गोट्या पवार (वय ३०), अनुज निनाजी कोरे (वय १९), आयुष सुनील खैरे (वय २०), हर्ष विनोद महाडिक (वय २०), सागर रमेश शिंदे (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे. आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे.
हेदेखील वाचा : Pune News: नव्या उपायुक्तांचा दणका; स्पेशल ड्राईव्हद्वारे कारवाई, स्थानिक पोलिसांना फुटला “घाम”
फिर्यादी निकम यांना आरोपींमध्ये जुना वाद होता. याच पूर्ववैमनस्यातून त्यांनी फिर्यादी यांना जीवन चौकात बोलावून घेतले. निकम हे आपल्या दोन मित्रांसह तेथे गेले असता, आरोपींनी त्यांच्यावर अचानक कोयत्याने हल्ला चढवला. हल्ल्यात निकम आणि त्यांचा मित्र रोहन रहाटे हे गंभीर जखमी झाले. आरोपींनी कोयते हवेत फिरवत परिसरात दहशत पसरवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली आणि सातही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.
राज्यात वाढतीये गुन्हेगारी
राज्यात गुन्हेगारी वाढली असून, दररोज राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना घडत आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली. पुण्यातील धानोरीत वैमनस्यातून टोळक्याने भावंडांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. याप्रकरणी पोलिसांनी टोळक्यावर गु्न्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे.