दुहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली; तरुणी आणि ६ महिन्यांच्या मुलाला चाकूने भोसकलं
दिल्लीत धक्कादायक घटना घडली आहे. नॉर्थ दिल्लीतील मजनू का टीला परिसरात एका २२ वर्षीय तरुणी आणि सहा महिन्यांच्या बालिकेची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे. या दुहेरी हत्येमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, आरोपी फरार झाला आहे. या हत्याकांडामागे पीडितेचा प्रियकर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Crime News: चोरटे घरात शिरले, लोखंडी गज घेतला अन्….; दौंडमध्ये घडला धक्कादायक प्रकार
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव सोनल असून ती आपल्या प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर सोनल त्याच्यापासून दूर झाली होती आणि आपल्या मैत्रिणी रश्मीच्या घरी येऊन मजनू का टीला येथे राहू लागली होती. रश्मीची सहा महिन्यांची मुलगी यशिकाही तिच्यासोबतच राहत होती.
मंगळवारी रश्मी घरी नसताना सोनलचा प्रियकर निखिल तिथे पोहोचला. त्याने सोनलशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात निखिलने सोनलवर धारदार चाकूने सपासप वार केले. इतक्यावरच थांबत न, त्याने तिथे असलेल्या सहा महिन्यांच्या निष्पाप चिमुरडीवरही चाकू हल्ला करून तिचाही जीव घेतला. दोघींनाही जागीच मृत्यू आला.
हा प्रकार घडला, तेव्हा घरात रश्मी उपस्थित नव्हती. काही वेळाने परिसरातील लोकांना सोनल आणि बालिकेच्या मृतदेहांची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केलं. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. दोघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीमही दाखल झाली असून, पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, निखिल नावाचा तरुण फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. प्राथमिक तपासातून हे वैयक्तिक रागातून घडलेलं हत्याकांड असल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र, तपासाअंती आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे महिलांवर अत्याचार थांबत नाहीत, तर दुसरीकडे निरागस चिमुकल्यांवरही हल्ले होत असल्याची गंभीर बाब समाजासमोर आली आहे.
सोनल आणि चिमुकली यशिकाच्या मृत्यूने केवळ त्यांच्या कुटुंबियांवर नव्हे, तर संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. आरोपी निखिलच्या तात्काळ अटकेसाठी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे. पोलीस लवकरात लवकर आरोपीला अटक करतील, असा विश्वासही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.