
Crime News: मोबाईलमधील डिलीट डेटा ठरला महत्त्वाचा; तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा
गोंदिया : देवरी तालुक्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या १८ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. तरुणीच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या तपासातून प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर आणि तत्कालीन पोलिस कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे चिचगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित १८ वर्षीय तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये काही कारणांवरून वारंवार वाद होत असल्याचे मोबाईलमधील संभाषणातून समोर आल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास तरुणीने राहत्या घरी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना तरुणीच्या वडिलांकडून संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, तपासादरम्यान तरुणीच्या मोबाईलमधील डिलीट करण्यात आलेला डेटा न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेतून मिळाला. या डेटामधील व्हॉट्सअॅप संभाषण आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनाक्रमाची पडताळणी सुरू केली. तपासात तरुणीच्या वैयक्तिक आयुष्यात एका पोलिस कर्मचाऱ्याने हस्तक्षेप केल्याचा आरोप समोर आला.
तपासानुसार, त्यावेळी देवरी येथील नक्षल गोपनीय शाखेत कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी ओमप्रकाश जामनिक याने तरुणीला अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवल्याचा आणि अनुचित मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे तरुणी आणि तिच्या प्रियकरामध्ये वाद निर्माण झाल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या आरोपांची कायदेशीर सत्यता तपासाच्या पुढील टप्प्यात निश्चित होणार आहे.
या प्रकरणी चिपोटा, ता. देवरी येथील विकेश अंबादे आणि सध्या अकोला येथे वास्तव्यास असलेला पोलिस कर्मचारी ओमप्रकाश जामनिक यांच्याविरुद्ध चिचगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांच्या तक्रारीवरून विकेश अंबादे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६, ५०४ आणि ५०६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर जामनिक याच्याविरुद्ध कलम ३५४(अ) आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात दोन्ही आरोपींना अद्याप अटक झालेली नसल्याची माहिती आहे. तीन वर्षांनंतर समोर आलेल्या मोबाईल डेटामुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली असून, उपलब्ध डिजिटल पुरावे आणि इतर बाबींची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.