Hadapsar police refute Kothrud police's claim that thieves showed lighters on camera Pune Crime News
Pune Crime News : पुणे : अक्षय फाटक : कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघडकीस आला आहे. डावी भूसारी कॉलनीतील श्री सुवर्ण सोसायटीत घरफोडीच्या प्रयत्नात पोलिसांना आव्हान देत सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर पिस्तूल दाखवणाऱ्या दोन चोरट्यांच्या प्रकरणात, कोथरूड पोलिसांनी ते “पिस्तूल नव्हे, लायटर आहे” असा ठाम दावा केला होता. पण, आता हडपसर पोलिसांनी त्याच मुलांना वाहन चोरीप्रकरणी पकडताच त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त झाले असून, कॅमेऱ्यात दिसलेले तेच पिस्तूल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या उघडकीनंतर कोथरूड पोलिसांचा दावा पूर्णपणे खोटा ठरला असून, गंभीर गुन्ह्यांवर पांघरुण घालण्याच्या पोलिसांच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या आठवड्यात (दि. २ ऑक्टोबर) परमहंसनगरातील श्री सुवर्ण सोसायटीत झालेल्या घरफोडीच्या प्रयत्नादरम्यान चोरट्यांनी सीसीटीव्हीत पिस्तूल दाखवून पोलिसांना उघड आव्हान दिले होते. पण काही तासांतच कोथरूड पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत “ते पिस्तूल नव्हे, लायटरसदृश वस्तू आहे” असा दावा केला होता. त्यामुळे तो प्रकार थंडावला होता.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मात्र, सहा दिवसांनी हडपसर पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान दोन १७ वर्षीय मुलांना वाहन चोरीप्रकरणी पकडले. यावेळी त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस सापडले. तपासात, यातील एक मुलगा हा येथील कॅमेऱ्यात पिस्तूल दाखविणारा अल्पवयीन असल्याचे समोर आले. तसेच, त्याच्याकडे तेच पिस्तूल देखील मिळाले. हेच पिस्तूल त्याने कॅमेऱ्यात दाखविल्याचे स्पष्ट झाले. या दोन अल्पवयीनांकडून हडपसर परिसरातील वाहन चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. पण या घटनेतून कोथरूड पोलिसांच्या “सत्य दडपण्याच्या” वृत्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनीच वास्तव झाकण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जनतेचा विश्वास डळमळीत करणारा प्रकार असल्याचं नागरिकांचं मत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हटलं होतं कोथरूड पोलिसांनी?
कॅमेऱ्यामध्ये पोलिसांना आव्हान देत या अल्पवयीन मुलाने बंदूक दाखवली होती. या प्रकरणी स्पष्टीकरण देताना कोथरुड पोलीस म्हणाले की, “कॅमेऱ्यात दिसलेली वस्तू ही पिस्तूल नव्हे, पिस्तूलसदृश लायटर आहे. हे प्रकरण गंभीर नाही, संबंधित आरोपी पकडले आहेत. घटनेमुळे नागरिकांनी घाबरू नये.” असे सांगत कोथरुड पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.
पण खरी वस्तुस्थिती काय निघाली?
हडपसर पोलिसांनी पकडलेल्या अल्पवयीनांकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. तपासात स्पष्ट झाले की, तेच पिस्तूल कॅमेऱ्यात दिसले होते. ८ वाहनचोरीचे गुन्हे उघड, एक जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे लायटर दाखवले असल्याचा कोथरूड पोलिसांचा दावा पूर्णपणे खोटा ठरला आहे.