न्हावरे-शिरूर रस्त्यावर गुरुवारी रात्री उशिरा अपघात. (संग्रहित फोटो_
विशेष म्हणजे, चौघांना धडक दिल्यानंतर जखमींच्या मदतीला धावून जाण्याऐवजी संबंधित वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या अमानुष प्रकारामुळे परिसरातून संताप व्यक्त होत असून, एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने आंबळे गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात कौशल्या वसंत झेंडे (वय ६१), सोहम राजीव झेंडे (वय १३) आणि आरुषी दत्तात्रय झेंडे (वय ११, सर्व रा.आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. तर ज्योती राजीव झेंडे (वय ४२) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयतांचे नातेवाईक संतोष अनिल झेंडे (वय ३६, रा.आंबळे, ता.शिरूर, जि.पुणे) यांनी या घटनेप्रकरणी न्हावरे पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे.
या घटनेबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबळे गावात सालाबाद प्रमाणे हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त दररोज रात्री महाप्रसाद आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतो, गुरुवारी (ता.२९) रात्री ज्योती झेंडे सासू कौशल्या झेंडे, मुलगा सोहम आणि शेजारी राहणारी व त्यांच्या चुलत जावेची मुलगी आरुषी हे चौघेही किर्तन ऐकण्यासाठी गावात गेले होते. कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशिरा चौघेही न्हावरे-शिरूर रस्त्याच्या कडेने पायी आपल्या घराकडे निघाले होते.
दरम्यान, आंबळे गावाजवळ असलेल्या केसरी हॉटेलसमोर न्हावरे बाजूकडून शिरूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला पायी चाललेल्या चौघांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चौघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात सोहम आणि आरुषी यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. तर ज्योती आणि कौशल्या झेंडे यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून शिरूर येथे हलविण्यात आले.
उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
कौशल्या झेंडे यांना शिरूर येथील श्रीगणेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी कौशल्या झेंडे यांना मृत घोषित केले. तर ज्योती झेंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वाहनचालकाने जखमींना केली नाही मदत
अपघाताची माहिती मिळताच आंबळे गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, अपघात घडवून आणणाऱ्या वाहनचालकाने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. एकाच कुटुंबातील सदस्यांसह दोन चिमुकल्यांचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा आणि वाहन चालकाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून, या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहनचालकाचा शोध घेण्याच्या सूचना
उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले आणि शिरूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन, पुढील कारवाईच्या आणि अपघात घडवून आणणाऱ्या वाहनाचा व वाहनचालकाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, न्हावरे पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके पुढील तपास करीत आहेत.
प्रश्न : अपघात कुठे झाला?
उत्तर : शिरूर तालुक्यातील आंबळे येथे न्हावरे-शिरूर रस्त्यावर केसरी हॉटेलसमोर अपघात झाला.
प्रश्न : अपघात कसा झाला?
उत्तर : कीर्तन ऐकून पायी घरी परतणाऱ्या चौघांना भरधाव अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली.
प्रश्न : अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?
उत्तर : अपघातात दोन अल्पवयीन मुलांसह एका वृद्ध महिलेचा, अशा तिघांचा मृत्यू झाला.






