६० वर्षीय पत्नीचा संशयावरून खून
अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे खंदारे वस्तीवर एका 65 वर्षीय वृद्धाने 60 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत धारदार कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली. यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो फोल ठरला. ही घटना गुरुवारी (दि.31) मध्यरात्री एकच्या सुमारास उघडकीस आली आहे. दगडू लक्ष्मण खंदारे असे आरोपीचे नाव असून, चंद्रकला खंदारे यांची त्याने हत्या केली.
आरोपी दगडू खंदारेसह त्याची पत्नी चंद्रकला, मुलगा भीमा, सून फुलाबाई, नातू राधेज, नात भक्ती असे एकत्र कुटुंब राहते. दगडू व त्याची पत्नी चंद्रकला रात्री घराजवळ पत्र्याचे खोलीत झोपण्यास जात होते. मागील वर्षी मद्यधुंद अवस्थेत गावातीलच एका व्यक्तीशी पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. तेव्हा तो त्याला मारण्यास काठी घेऊन घरी गेला होता. त्यावेळी खंदारे यांचा मुलगा भीमा याने त्यांना समजावून सांगत प्रकरण शांत केले होते. त्यानंतरही संशयावरून खंदारे सतत पत्नी चंद्रकला यांना शिवीगाळ, मारहाण करत होता.
बुधवारी संपूर्ण कुटुंबाने एकत्रित जेवण केले. त्यानंतर शेतातील पत्र्याच्या खोलीत दोघे झोपण्यास गेले. तेथे खंदारे याने पत्रा शेडच्या गेटला आतून कुलूप लावले आणि पत्नी चंद्रकला यांच्यावर धारदार कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या करायचे ठरवले. त्यात तो वाचला. नंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.
मुलाला आई दिसली रक्ताच्या थारोळ्यात
गुरुवारी रात्री एकच्या सुमारास वडील शांत झाले का, पाहण्यास मुलगा भीमा गेले असता त्यांना आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. वडील तेथे नसल्याने फरार असल्याचे लक्षात आले. या भयानक हल्ल्यात चंद्रकला खंदारे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याची माहिती मुलाने पोलिसांना दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलगा भीमा यांच्या फिर्यादीवरून वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
स्वतःच झाला पोलिसांच्या हवाली
पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केल्यानंतर शेडच्या जाळीवरून उडी मारून जवळच मुळा नदीत खंदारे याने उडी मारली. मात्र, पोहता येत असल्याने आत्महत्येचा प्रयत्न फसला. परत पत्र्याच्या शेडमध्ये येऊन अंगावरील ओले कपडे बदलले. त्यानंतर घारगाव पोलिस ठाणे गाठले व तेथे खुनाची कबुली दिली.
जेवतानाच दिली होती मारण्याची धमकी
बुधवारी संध्याकाळी जेवण करताना खंदारे याने पत्नी चंद्रकला यांच्यावर संशय घेत ‘तू त्याच्याकडे निघून जा’, असे म्हणत शिवीगाळ केली. तिचे संबंध असलेल्या व्यक्तीस किंवा आईस मारून टाकेल, अशी धमकीही मुलाशी बोलताना त्याने दिली होती.