पैसे दे नाहीतर...; पुणे शहरात चोरट्याचा धक्कादायक कारनामा उघड
पुणे : पैसे दे नाहीतर चाकूने वार करतो, अशी धमकी देत चोरट्याने एकाच्या हातातील मोबाइल हिसकावून नेल्याची घटना खराडी परिसरात घडली. याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून निलेश वाघमारे (वय २४) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३ डिसेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार खराडी येथील थिटे वस्तीत राहतात. त्यांच्या दोन मुलांसोबत काळूबाई नगर येथे आइसक्रीम खात होते. त्यावेळी त्यांच्या तोंड ओळखीचा असणारा आरोपी निलेश तेथे आला. त्याने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास चाकूने वार करण्याची धमकी दिली. तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा निलेशने तक्रारदाराच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला. त्यानंतर तक्रारदाराने पोलिसात धाव घेत तक्रार दिली.
राणी हार हिसकावला
एरंडवण्यातील राजा मंत्री रस्त्यावर (डी. पी. रस्ता) एका महिलेचा एक लाख रुपये किमतीचा राणी हार हिसकावून नेल्याची घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी बिबवेवाडी येथे राहणाऱ्या ४६ वर्षीय महिलेने तक्रार दिली असून, अलंकार पोलिसांत दुचाकीवरील दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला कार्यक्रमाला बिबवेवाडी येथून डीपी रस्त्यावरील एका बँक्वेट हॉलला आल्या होत्या. त्या बँक्वेट हॉलच्या बाहेर असताना रस्त्यावर विरुद्ध दिशेने दुचाकीवरून दोघे आले व मागे बसलेल्या व्यक्तीने काही कळायच्या आत महिलेच्या गळ्यातील राणी हार हिसकावला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अलंकार पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
नवी पेठेतील बंगला फोडला
पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसाखाली नवी पेठेत चोरट्यांनी बंगला फोडून चोरट्यांनी ४ लाख ८६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समीर सुधाकर देशमुख (वय ४६, रा. आनंद बंगला, लक्ष्मीकृपा सोसायटी, नवी पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, देशमुख कुटुंबीय मंगळवारी रात्री बाणेर येथील नातेवाईकांकडे गेले होते. ते राहण्यास नवी पेठेतील रामबाग कॉलनीत आहेत. बुधवारी सकाळी देशमुख कुटुंबीय नातेवाईकांकडून परतले. तेव्हा दरवाज्याचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून ४ लाख ८६ हजारांचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक विजयमाला पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक खाडे करत आहेत.