
पीएमपी बसांचे इंडिकेटर-ब्रेक लॅम्प बंद
इंडिकेटर व ब्रेकलॅम्प बंद असतानाही बसेस रस्त्यावर
अपघात व वादाचे प्रमाण वाढले
चंद्रकांत कांबळे/पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दैनंदिन संचलनातील अनेक बसांमध्ये इंडिकेटर, हेडलॅम्प, टेललॅम्प आणि ब्रेकलॅम्प बंद अथवा तुटलेल्या अवस्थेत आहेत.बस वळताना इंडिकेटरचा सिग्नल न दिल्याने तसेच बस थांबताना ब्रेकलॅम्प न लागल्याने मागील वाहनचालकांना कल्पना येत नाही. परिणामी, रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत असून विशेषतः पीएमपी बस आणि दुचाकीस्वारांमध्ये वाद-विवाद व भांडणे होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीपर्यंत पीएमपीची सार्वजनिक वाहतूक सेवा कार्यरत आहे. पीएमपीच्या सुमारे ३८१ ते ३८८ विविध मार्गांवर दररोज सुमारे १,६८० ते १,७९५ बसेस शहराच्या कानाकोपऱ्यातून, गर्दीच्या आणि अरुंद रस्त्यांवरून धावत असतात. मात्र, या बसांमध्ये आवश्यक असलेले सिग्नल लॅम्प बंद असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. अनेक वेळा अपघातानंतर रस्त्यावरच वाद होऊन तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्रवाशी करत आहेत.
चोरांची नवी करामत! PMP बसमध्ये टोळी सक्रिय; पोलिसांकडून आठ दिवस गस्त अन् पुन्हा…
विशेषतः मध्यवर्ती पेठांमधील अरुंद रस्ते किंवा प्रमुख मार्गांवरून जाताना अचानक बस वळवल्याने अपघातांचे प्रमाण अधिक आहे. बस थांबताना ब्रेकलॅम्पचा सिग्नल न मिळाल्याने मागील वाहन धडकण्याचे प्रकार घडत असून त्यातून वाहतूक कोंडी वाढत आहे. गर्दीच्या वेळेत याचा मोठा फटका बसत आहे. आधीच रस्त्यांवरील अतिक्रमण, वाहनांची वाढती संख्या आणि बेशिस्त वाहतूक यामुळे कोंडी होत असताना पीएमपी बसांचे बंद इंडिकेटर हा प्रश्न त्रासदायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बऱ्याच वेळा बस वळताना दुचाकी आणि पीएमपी बसमध्ये अपघात होतात. अनेक बसेसचे इंडिकेटर आणि ब्रेकलॅम्प बंद असल्याने गैरसमज होतात आणि वाद निर्माण होतात.
पीएमपी वाहनचालक
पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! PMP प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; निष्काळजीपणा आढळल्यास…
मोटार वाहन कायद्यानुसार हेडलॅम्प, टेललॅम्प आणि ब्रेकलॅम्प कार्यरत असणे बंधनकारक आहे. ते बंद असतील तर मोठ्या अपघातांची शक्यता असते. पीएमपी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कायद्यानुसार कारवाई करावी.
संजय शितोळे,
पीएमपी प्रवासी मंच
पीएमपीचा आढावा
एकूण बस : २,०४९
संचलनातील बस : १,७९५
एकूण मार्ग : ३८८
दैनंदिन फेऱ्या : २१,४४५