
Indigo Flight Human Bomb Threat:
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कुवैतहुन हैदराबादला निघालेल्या इंडिगोच्या विमानात मानवी बॉम्ब असल्याची धमकीचा मेल दिल्ली विमानतळ अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. या मेलमध्ये विमानात मानवी बॉम्ब असल्याची धमकी नमुद करण्यात आली होती. जी अधिकाऱ्यांना अत्यंत संवेदनशील वाटत होती. मेल मिळताच विमानतळ अधिकारी ताबडतोब सतर्क झाले. अधिकाऱ्यांनी पायलटला विमानाचे मुंबई विमानतळावरच लँडिग करण्यास सांगितले. टेकऑफनंतर लगेचच या धमकीमुळे विमान मुंबईकडे वळवण्यात आले.
विमान मुंबईकडे वळवण्यात आले
विमानाचे आपात्कालीन लँडिंग होईपर्यंत विमानतळ अधिकाऱ्यांनी आधीच सर्व खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या होत्या. आपत्कालीन प्रतिसाद पथकांसह सुरक्षा दल पूर्णपणे तैनात करण्यात आले, विमानतळ अधिकारीदेखील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विमानातील प्रवाशांच्या संख्येबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. इंडिगो एअरलाइन्सने देखील अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
गेल्या काही महिन्यांपासून विमानतळांना सातत्याने बॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत. सोमवारी, महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरातील एका खाजगी शाळेला बॉम्बची धमकी मिळाली. सकाळी ६:३० च्या सुमारास शाळेच्या कार्यालयात एक ईमेल आला, ज्यामध्ये शाळेत बॉम्ब ठेवल्याचे आणि त्याचा स्फोट करणार असल्याचे म्हटले होते.
शाळा प्रशासनाने ताबडतोब पोलिसांना कळवले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बॉम्ब पथकाने संपूर्ण कॅम्पसची तपासणी केली. तथापि, त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शाळेतील सुरक्षा वाढवण्यात आली आणि वर्ग पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.