Pune Crime news
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी पदाधिकारी शंतनु कुकडे याच्यावर दोन बलात्काराचे गुन्हे नोंद झाल्यानंतर याप्रकरणात पोलिसांच्या तपासातून धक्कादायक बाबी समोर आल्या असून, त्याच्या खात्यावर जवळपास १०० कोटी रुपये आल्याचे समोर आले आहे. तर, त्यातील ४० ते ४५ कोटी रुपये वेगवेगळ्या २० ते २५ व्यक्तींच्या खात्यावर वर्ग झाले आहेत. शंतनु कुकडेच्या सीएच्या खात्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना पावणे दोन कोटी रुपये दिले गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मानकर यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे, अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त संदीससिंह गिल्ल यांनी दिली.
शंतनु कुकडे याच्यावर बलात्कारप्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद झाले आहेत. यात एका गुन्ह्यात गँगरेपचे कलम वाढविले आहे. तत्पुर्वी कुकडे हा रेड हाऊस या नावाने एक संस्था चालवित होता. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केल्यानंतर त्याच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात रक्कम आल्याचे व त्या वेगवेगळ्या खात्यावर गेल्याचे चौकशीत समोर आले. त्यानूसार या प्रकरणाचा तपास बलात्कार तसेच आर्थिक अश्या दोन्ही पातळीवर सुरू करण्यात आला आहे.
कुकडे चेन्नई स्थित एका विदेशी कंपनीत डायरेक्टर होता. त्याचे नातेवाईक संबंधित कंपनी होती. याकंपनीचे शेअर्स विकून १०० कोटींच्या जवळपास रक्कम त्याच्यावर वैयक्तिक खात्यावर आली. दरम्यान, रोहन जैन हा सीए आहे. तो शंतनु कुकडे याचे आर्थिक व्यावहार पाहतो. त्याच्या खात्यावरून पावणे दोन कोटी रुपये दिपक मानकर यांच्या खात्यावर गेले. त्यासंदंर्भाने जबाब नोंदविला आहे.
रोहन जैन याच्याशी माझे गेले दहा ते बारा वर्षांपासून संबंध आहेत. रोहक जैन याला माझी पाच एक्कर जमीन विक्री केली आहे. त्यातील ही रक्कम आहे. त्यासदंर्भाने इसार पावती देखील पोलिसांना जमा केली आहे. याच व्यावहारातील पैसे आणखी रोहन जैन याच्याकडून येणे आहे.
– दिपक मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस पाटी, शहर अध्यक्ष, पुणे