
संभाजीनगर हादरले! १९ वर्षीय तरुणाचा अमानुष छळ; लोखंडी सळईने मारहाण अन्...., ५ दिवसांच्या झुंझीनंतर मृत्यू (Photo Credit- X)
प्रकरणात अपहरण करणाऱ्या आरोपींपैकी तिघांना हसूल पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संकेत मोतीलाल गायकवाड (२४), विकास शेषराव वाघमारे (२१), आदित्य राजू आव्हाड (१८, सर्व रा. एकतानगर, हसूल) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अशी माहिती हसूल ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली.
मृत तरुणाचे नाव अनिकेत अण्णा राऊत (१९, रा. रमाईनगर, हसूल) असे आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो एमजीएम रुग्णालयात काम करत होता. २ जानेवारी रोजी सकाळी ६.४५ वाजता अनिकेत हा कामावर जाण्यासाठी घरातून निघाला होता. दरम्यान, चार जणांच्या टोळक्याने काळ्या रंगाच्या बुलेटसह एका दुचाकींवर आलेल्या चौघा आरोपींनी अनिकेतला जबरदस्तीने भीमटेकडी या निर्जन भागात नेवून मारहाण केली.
Crime News: सरकारी नोकरीच्या नावे ४० लाखांची फसवणूक; चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
आरोपीनी अनिकेतला अर्धनग्न करून त्याला लोखंडी रॉड, लाकडी दांडके व धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. आमच्या आंटीला का छेड़तोस? असे म्हणत त्याच्या पायाच्या नळीवर इतके प्रहार करण्यात आले की पाय फ्रेंक्चर झाला. पाठीवर चाकूचे वार करून त्याला मृत समजून मकई गेट परिसरात फेकून देण्यात आले. या दरम्यान त्याचा मोबाईलही हिसकावून घेतला. प्रकरणात मृत अनिकेतचे वडिल अण्णा रंगनाथ राऊत (४०, रा. रमाईनगर, हर्सल) यांनी तक्रार दिली.
सकाळी ८ वाजता अनिकेत गंभीर अवस्थेत मकई गेट परिसरात आढळून आला. नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ७ जानेवारी रोजी त्याचा दुर्दैवी अंत झाला.
या घटनेचा तपास करताना पोलिसांनी ३ जानेवारी रोजी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये तोंड बांधलेल्या एका आरोपीकडून अनिकेतला अर्धनग्न अवस्थेत नेत असल्याचे स्पष्ट दिसून आले. ४ जानेवारी रोजी शुद्धीवर आल्यानंतर अनिकेतने इंस्टाग्रामवर आरोपीचे फोटो पाहून मुख्य आरोपी व त्याच्या साथीदारांची ओळख पटवली. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.