आयर्लंडमध्ये भारतीय वंशाच्या 6 वर्षांच्या मुलीवर हल्ला; गुप्तांगावर सायकलने... (फोटो सौजन्य-X)
आयर्लंडमधील वॉटरफोर्ड शहरात एका सहा वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीवर वांशिक हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी (४ ऑगस्ट) संध्याकाळी घडली जेव्हा ती तिच्या घराबाहेर तिच्या मैत्रिणींसोबत खेळत होती. हल्लेखोर १२ ते १४ वयोगटातील होते आणि हल्ला करताना त्यांनी मुलीला सांगितले, “घाणेरडे भारतीय, भारतात परत जा.” त्यांनी मुलीच्या गुप्तांगांवरही हल्ला केला. आयर्लंडमध्ये भारतीय वंशाच्या मुलावर नोंदवलेली ही पहिलीच वांशिक हिंसाचाराची घटना असल्याचे ही म्हटलं जातं आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांत आयर्लंडमध्ये भारतीय नागरिकांवर अनेक हल्ल्यांच्या बातम्या आल्या आहेत.
पीडितेची आई व्यवसायाने नर्स आहे आणि गेल्या आठ वर्षांपासून आयर्लंडमध्ये राहत आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने सांगितले की, ती तिच्या १० महिन्यांच्या मुलाला घरात दूध पाजत होती आणि तिच्या मुलीवर बाहेर खेळताना लक्ष ठेवून होती. “मी तिला सांगितले होते की मी फक्त एका मिनिटात परत येईन, पण नंतर माझा धाकटा मुलगा रडू लागला.” काही क्षणांनी ती मुलगी रडत घरी परतली. आई म्हणाली, “ती खूप घाबरली होती, तिला नीट बोलता येत नव्हते. ती फक्त रडत होती.” मुलीच्या एका मैत्रिणीने सांगितले की एका मुलाने तिच्या गुप्तांगावर सायकलने मारले आणि पाच मुलांनी तिच्या तोंडावर मुक्का मारला. त्यांनी तिला शिवीगाळही केली आणि म्हटले, “फ… फ, डर्टी इंडियन, भारतात परत जा.”
मुलीच्या आईने सांगितले की ही घटना तिच्यासाठी धक्कादायक होती. “मी कधीच विचार केला नव्हता की येथे असे काही घडेल. मला वाटले होते की ती येथे सुरक्षित असेल. पण आता ती बाहेर खेळायला घाबरते.” तिने असेही सांगितले की घटनेनंतरही हल्लेखोर मुले त्याच परिसरात फिरत होती आणि जेव्हा त्यांनी आईला पाहिले तेव्हा ते तिच्याकडे हसत पाहू लागले.
या घटनेनंतरही पीडितेच्या आईने सांगितले की, ती हल्लेखोर मुलांना शिक्षा मागत नाही. त्याऐवजी त्यांना समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन मिळावे अशी तिची इच्छा आहे. “आम्ही इथे कामासाठी आलो आहोत. आमच्याकडे पदवी आहे, अनुभव आहे. आम्ही व्यावसायिक आहोत. सरकारला आमची गरज आहे. पण आता आम्हाला आमच्या स्वतःच्या घरासमोर सुरक्षित वाटत नाही.”
ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा आयर्लंडमध्ये भारतीयांवरील हल्ले वाढत आहेत. गेल्या महिन्यात, डब्लिनच्या तल्ला भागात किशोरांच्या टोळीने एका ४० वर्षीय भारतीय व्यक्तीवर हल्ला केला आणि त्याला रस्त्यावर नग्न केले. केवळ १९ जुलैपासून, डब्लिनमध्ये भारतीय वंशाच्या लोकांवर तीन हल्ले झाले आहेत.