
Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव: मेहरूण परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान भागात रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या गटारीत दुचाकी कोसळून ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवल अर्जुन सोनवणे असे मृत तरुणाचे नाव आहे. गटारीचे काम अपूर्ण असताना घटनास्थळी कोणताही इशारा फलक किंवा सुरक्षेची उपाययोजना नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर संबंधित मक्तेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नवल सोनवणे हे शेतातील काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत होते. मेहरूण बगीचा परिसरात काँक्रीटच्या गटारीचे काम सुरू आहे. या कामाचा काही भाग अपूर्ण अवस्थेत असल्याने रस्त्याच्या मधोमध असलेल्या गटारीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यातच कोणताही इशारा फलक नसल्याने दुचाकीसह ते गटारीत कोसळले.
दुचाकीसह गटारीत पडल्याने नवल सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुर्घटनेनंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
नवल सोनवणे हे जळगाव येथील रामेश्वर कॉलनीत पत्नी, आई, मुलगा आणि मुलीसह राहत होते. अचानक झालेल्या या दुर्घटनेने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रामेश्वर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, रस्त्याच्या मधोमध गटारीचे काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती का, तसेच अपूर्ण कामाच्या ठिकाणी इशारा फलक का लावण्यात आला नव्हता, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित मक्तेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.