सौजन्य फोटो - टिम नवराष्ट्र
मेढा : राज्यात दारूबंदीच्या प्रयोगासाठी ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यात अवैध मद्यविक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने २१ सप्टेंबर रोजी तालुक्यातील विविध गावांमध्ये अचानक छापे टाकत आठ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईत देशी-विदेशी दारू आणि बिअरसह एकूण २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संपूर्ण जावळी तालुक्यात दारूबंदी असतानाही काही भागांत अवैधपणे दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. या कारवाईमुळे दारूबंदीच्या अंमलबजावणीवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. अवैध मद्यविक्री रोखण्याची जबाबदारी पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाची असताना, दोन्ही विभागांमधील समन्वयाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
जावळी तालुका दारूमुक्त करण्यासाठी काही वर्षांपूर्वी महिलांनी मोठी चळवळ उभारली होती. त्यामुळे जावळीची दारूबंदी ही केवळ प्रशासकीय निर्णय न राहता सामाजिक चळवळीचा विषय बनली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात चोरून दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत बिभवी, मेढा, सोमर्डी, करहर, सोनगाव आणि आनेवाडी या भागांत दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत पुढीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला :
जावळी तालुक्यातील अवैध मद्यविक्रीकडे उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांनी विशेष लक्ष दिल्यानंतर विभागाची कारवाई वेगाने सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी अवैध मद्यविक्रीच्या कारवाईवरून पोलिस आणि उत्पादन शुल्क विभाग यांच्यात जबाबदारी ढकलली जात असल्याची चर्चा होती. मात्र, आता उत्पादन शुल्क विभागाने एकाच दिवशी आठ ठिकाणी केलेल्या कारवाईमुळे दारूबंदीच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
अवैध व्यवसाय ज्या हद्दीत आढळतील, त्या भागातील संबंधित बिट अंमलदारांवर कारवाई करण्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून यापूर्वी देण्यात आले होते. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने ज्या भागांत अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई केली, त्या हद्दीतील संबंधित बिट अंमलदारांवर पोलीस अधीक्षक पिंगळे कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता याबाबत पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे जावळीकरांचे लक्ष लागले आहे.
बिभवी, मेढा, सोमर्डी, करहर, सोनगाव आणि आनेवाडी परिसरात कारवाई करून आठ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. देशी-विदेशी दारू आणि बिअरसह २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.






