अजितदादांच्या अपघाताच्या तपासावर रोहित पवारांनी उपस्थित केले प्रश्न
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असून तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एवढंच नाही, तर या प्रकरणासंदर्भात 15 नोव्हेंबरला महत्त्वाचं प्रेझेंटेशन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे या प्रेझेंटेशनमध्ये नेमकं काय समोर येणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. (Ajit Pawar Accident Case)
रोहित पवार म्हणाले की, अजितदादांच्या अपघाताबाबत आमच्या मनात अनेक शंका आहेत. ज्या पद्धतीने तपास व्हायला हवा होता, तसा तो होताना दिसत नाही. साधी एफआयआरदेखील दाखल होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील 90 टक्क्यांहून अधिक लोकांना हा अपघात नसून घातपात असावा, असं वाटत असल्याचा दावाही त्यांनी केला.
अजित पवारांच्या अपघातात सुनील तटकरेंचा हात? रामदास कदमांच्या आरोपांनी राजकारणात मोठी खळबळ
या प्रकरणात काही महत्त्वाच्या बाबी जनतेसमोर आणण्यासाठी 15 नोव्हेंबरला प्रेझेंटेशन करणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. या माध्यमातून अजितदादांना न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नांना मदत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सुनील तटकरे यांचं नाव या प्रकरणाशी जोडण्यावर बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना पुरावे समोर आणण्याचं आवाहन केलं.
दरम्यान, कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील राजकीय संघर्षावरही रोहित पवारांनी भाष्य केलं. सतेज पाटील यांच्या पॅनेलला बहुमत मिळालं असतानाही शासननियुक्त संचालकांच्या माध्यमातून सत्तेचं गणित बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची असल्याचा दावा करत त्यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याशिवाय चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय शक्य नसल्याचंही ते म्हणाले.
गोकुळमधील संघर्ष केवळ दूध संघाच्या अध्यक्षपदापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील संविधान वाचवण्याची लढाई असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं.
एकीकडे अजितदादांच्या अपघाताच्या तपासावरून प्रश्न उपस्थित होत आहेत, तर दुसरीकडे गोकुळच्या राजकारणावरून सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू आहे. आता 15 नोव्हेंबरच्या प्रेझेंटेशनमध्ये रोहित पवार कोणते मुद्दे मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘तटकरेंना अजितदादांची जागा घ्यायची होती’; रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप






