सौजन्य - नवराष्ट्र टीम
धुळे : धुळे शहरातील गरताडबारी या भागाजवळ अपघाताची भीषण घटना घडली आहे. या दुर्घटनेत मुळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी आणि मुंबईत कार्यरत असलेले पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत असून ट्रकचालकाने चारचाकी वाहनाला धडक दिल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात इतर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबईत पत्रकार असलेले हर्षल भदाणे हे बोरकुंड येथे आपल्या गावी आलेले असताना ते धुळे शहरात आले होते. सायंकाळी बोरकुंड गावी परत जात असताना गरताड गावाजवळ रस्त्याच्या कडेला त्यांची गाडी उभी होती, यावेळी समोरून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने त्यांची गाडी लांबपर्यंत ओढत नेली. यावेळी हर्षल भदाणे पाटील यांनी स्वतःला वाचवण्यासाठी वाहनातून उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी ट्रकच्या मागील चाकात येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान या चारचाकी वाहनात हर्षल पाटील यांच्यासोबत असलेले अतर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना धुळे शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे धुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान धुळे शहर पोलिसांनी सदर ट्रक चालकाला व त्याच्या एका सहकार्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करीत त्याची माहिती पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली.






