
अरुण गवळीच्या गॅंगची साथ, शुल्लक कारण अन् गुन्हेगारीकडे वळण; जाणून घ्या बाबा बोडके टोळीचा इतिहास
कमलाकर उर्फ बाबा बोडके मुळचा भोर तालुक्यातील वाडाणी गावचा. वडिलोपार्जित शेती मुख्य व्यवसाय. पण, ते पुण्यात वास्तव्यास आले. वडिल कुस्ती पट्टू होते. कसबा पेठेत शिक्षण घेतलेल्या बाबा बोडके याने दहावीनंतर शिक्षण सोडून दिले आणि एका गॅरेजमध्ये नोकरी सुरू केली. पेठांमध्ये वाढत असलेल्या ‘बाबा’ची दिनचर्या नोकरी आणि घर अशीच. पण, त्याच्या एका मित्राजवळ चाकू सापडला आणि पोलिसांनी याप्रकरणात बाबा व त्याच्या मित्रावर पहिला गुन्हा १९९४ साली दाखल केला. हे सुरू असताना त्याने स्वत:चे गॅरेज देखील सुरू केले होते.
शुल्लक कारण अन् गुन्हेगारीकडे वळण
१९९५ मध्ये देवीची घटस्थापना झाली होती. घटस्थापनेला बाबा बोडके डेक्कन परिसरात देवीच्या दर्शनाला गेला. दर्शन घेत असताना तेव्हाच्या प्रदीप सोनावणे टोळीतील नण्या कण्हेरकर याला त्याचा धक्का लागला. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादानंतर बाबा याला सोनावणे टोळीने बोलवून घेत बेदम मारहाण केली. सोनावणे टोळीकडून मारहाण झाल्याची वार्ता तेव्हा पुर्ण पुण्यात पसरली. पण, सोनावणे टोळीच्या दहशतीने बाबाने मारहाण प्रकरणात तक्रार दाखल केली नाही. परंतु, ही वार्ता अरूण गवळी गँगचा जेलमधील साथीदार राजेश भणगे उर्फ बटाटा याला समजली. त्याने त्याची मुले पाठवली. बाबाला शस्त्रे पुरवली. बाबाने या मारहाणीचा बदला १९९६ मध्ये घेतला. बटाटा व बाबा बोडके याच्या मित्रांनी घरात घुसून गुंड प्रदिप सोनावणे याचा गोळ्या झाडून सकाळी सकाळी खून केला आणि या खूनाने बाबा बोडके टोळीचे वलय निर्माण झाले.गुन्ह्यात अटक झाल्यानंतर १९९९ मध्ये कारागृहातून बाबा बोडके बाहेर आला. साधारण, २० ते २५ गुन्हे नोंद आहेत.
बोडके टोळीत मुलांचा भरणा झाला
गुंड प्रदिप सोनावणेच्या एकाच खूनानंतर बोडके टोळीचे साम्राज्य काही वर्षातच प्रचंड वाढले. मुलांचा भरणा देखील मोठा झाला. खून, खूनाचे प्रयत्न, दरोडा तसेच खंडणी सारखे गुन्हे एका मागोमाग एक गुन्हे दाखल होत राहिले. टोळीत संदिप मोहोळ, माऊली जावळकर, सचिन पासलकर अशी मुले पुढे गुन्हेगारीत पुण्यात ओळखली गेली.
मोक्कानुसार पहिली कारवाई
२००३ मध्ये समर्थ, सहकारनगर तसेच डेक्कन पोलिस ठाण्यात खूनाचे आणि इतर गुन्हे दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा बाबा बोडके व टोळीवर मोक्का कारवाई झाली. या कारवाईत त्याला जन्मठेपेची शिक्षा देखील लागली.
अनिल मारणेचा खून
गणेश मारणे, सचिन पासलकर व माऊली जावळकर हे मित्र. गणेश मारणेचा अनिल मारणे हा एक मित्र होता. तर सचिन पासलकर व माऊली जावळकर हे बाबा बोडके याला माणत होते. पण, अनिल मारणे व या दोघांत वाद झाला. त्यातून माऊली जावळकर याच्यावर हल्ला केला होता. त्याचा बदला म्हणून बाबा बोडके टोळीने अनिल मारणे याचा वानवडीत खून केला.
बाबा बोडके याने प्रदिप सोनावणेचा खून केल्यानंतर सोनावणे टोळीचा व बोडके टोळीचा मोठा भडका उडेल अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु, तत्कालीन एका गृहराज्यमंत्र्यांनी हा वाद एका मोठ्या कार्यालयात बसवून मिटवला असल्याचे सांगितले आहे. त्यासोबत बाबा बोडके याची आई नारायण पेठेतील होती. त्यामुळे त्याचे मामाचे वलय या भागात होते. ही रसद देखील त्याच्या सुरक्षेचा कवच बनली असल्याचे मत पोलिसांचे आहे.
बाबा बोडके टोळी पोलिसांच्या तपासातून गेल्या काही वर्षात निष्क्रीय असल्याचे समोर आले आहे. बाबा बोडके गुन्हेगारी क्षेत्र सोडून सामाजिक कार्य तसेच व्यावसायाकडे वळला आहे. सध्या शेती तसेच इतर व्यवसाय यामध्ये बाबा बोडके आहे. काही वर्षांपासून तो गुन्हेगारी क्षेत्रात अॅक्टीव्ह नसल्याचे सांगितले जाते.
बाबा बोडके याने काही वर्षांपुर्वी राजकीय क्षेत्रात देखील पर्दापण केले होते. पण, राजकीय क्षेत्रात देखील दुश्मनी सुरू होते. हे लक्षात आल्यानतंर त्याने राजकारणातून देखील काढता पाय घेतला. आता फक्त व्यावसायात रमलेला बाबा बोडके हा व्यवसाय चालवितो. काही जानकर अधिकाऱ्यांच्या मते बाबा बोडके हुशार होता. त्याला गुन्हेगारीत किती धोका आणि पुढे काय हे लवकर समजले. त्यामुळे तो गुन्हेगारीतून बाहेर तितक्याच वेगाने पडला. आणि व्यावसायात शिरला. त्यासाठी त्याने पुण्यात न लक्ष देता मुळ गावी भोरमध्ये लक्ष देण्यास सुरूवात केली. बोडके याच्यावरील सर्व गुन्हे निर्दोश सुटलेले आहेत. शेती, सामाजिक कार्य करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. तसेच, गावी सामूदायिक विवाह सोहळेही लावत असतो.