वारुळवाडी येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला; मांडीवर दोन दात तर पायावर पंजाने ओरखडले
नारायणगाव : नारायणगाव सावरगाव रस्त्यावरील वारुळवाडी गावच्या हद्दीत गुंजाळवाडी येथील रहिवासी तुकाराम हरिभाऊ ढवळे (वय 50) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. हा हल्ला शुक्रवारी (दि.28) सायंकाळी साडेसातच्या दरम्यान झाला. या हल्ल्यात ढवळे यांच्या मांडीवर दोन दात तर पायावर पंजाने ओरखडल्यामुळे ते जखमी झाले.
तुकाराम ढवळे हे दत्तात्रय ढवळे यांच्या दुचाकीवर मागे बसून गुंजाळवाडीकडे घरी चालले होते. दुचाकी धुमाळीच्या ओढ्याजवळ आली असता शेजारील केळीच्या बागेतून अचानक आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते दोघेही गाडीवरून खाली पडले नाहीत. त्यानंतर बिबट्याने पलीकडच्या शेतात धूम ठोकली. आरडाओरडा झाल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तुकाराम ढवळे यांना वारुळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉ. मिसाळ व राजदेव सिस्टर यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून लस घेण्यासाठी नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. जखमी तुकाराम ढवळे यांची प्रकृती आता स्थिर आहे.
दरम्यान, या घटनेअगोदर याच ठिकाणी अवघ्या वीस मिनिटांपूर्वी आणखी एका दुचाकीस्वारास हा बिबट्या आडवा गेला होता. तसेच दुपारीही शेतकरी लहू गाडेकर यांच्यावर तर सायंकाळी लसूण काढणाऱ्या महिलांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्ती असून, रात्री वाहनांची सतत वर्दळ असते. तरीही बिबट्यांचे हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये बिबट्याविषयी भीतीचे वातावरण आहे.
जुन्नर तालुक्यात बिबट्याचा उच्छाद
जुन्नर तालुक्यातील बिबट समस्येने आता उच्छाद मांडला असून, शेतकरी रोजच भयभीत वातावरणात शेती कसत आहेत. वारंवार मागणी करूनही शेतीला दिवसा वीज दिली जात नाही, बिबट समस्येचे निराकरण करण्यासाठी शासकीय पातळीवर कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. आमदार, खासदार, मंत्री केवळ पोकळ आश्वासने देऊन निघून जातात. कोणताही ठोस निर्णय होत नाही. जुन्नर तालुक्यात बिबट हल्ल्यात अनेक महिला, बालकांचे बळी गेलेले आहेत. त्यामुळे या भागात नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
तीव्र आंदोलनाचा इशारा
वारुळवाडीचे माजी सरपंच राजेंद्र मेहेर, शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे, रमेश शिंदे यांनीही यासंदर्भात ठोस उपाययोजना न केल्यास सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा उपवनसंरक्षक अमोल सातपुते वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण व इतर वन कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती केली यावर अधिकारी देखील निरुत्तर झाल्याचे पाहिला मिळाले.