
Mahanagar Gas : तुम्ही महानगर गॅसधारक आहात? तर, ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे..!
दरम्यान, अलीकडच्या काळामध्ये महानगर गॅसच्या अनेक ग्राहकांना सायबर भामट्यांनी अनेक वेळा फसवले आहे. नेहमीच सायबर भामट्यांकडून महानगरच्या ग्राहकांना गॅस बिलाचे बनावट अपडेट्स आणि गॅस पुरवठा खंडित करण्याचे संदेश पाठवण्यात येतात. तसेच त्यांना संशयास्पद लिंक्सवर क्लिक करण्यास, एपीके फाइल्स डाउनलोड करण्यास किंवा संवेदनशील माहितीची देवाण-घेवाण करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
सायबर भामटे नेहमीच वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून विविध स्तरावर घोटाळे करत असतात. ग्राहकांनी संवेदनशील माहिती उघड करावी किंवा त्यांच्या डिव्हाइसेसवर मालवेअर इन्स्टॉल करावे यासाठी ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी या सायबर भामट्यांकडून सापळा रचला जातो.
महानगरने आपल्या ग्राहकांना अशा घटनांबाबत सतर्क राहण्याच्या व अशा फसव्या संदेशांना प्रतिसाद न देण्याची सूचना केली आहे. एखादा संशयास्पद संदेश किंवा कॉल आल्यास प्रथमतः ग्राहकांनी एमजीएलच्या अधिकृत चॅनेल्सद्वारे थेट संपर्क साधून तत्काळ सदरची पडताळणी करण्याची विनंती कंपनीकडून करण्यात आली आहे.
जर एखाद्या संदेशाबाबत संशय निर्माण झाल्यास ग्राहकांनी तातडीने (022) 68674500 वा (022) 61564500 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन महानगरने केले आहे. तसेच व्हॉट्सअॅपवर संवाद साधण्यासाठी एमजीएलच्या अधिकृत क्रमांक +91 98992 03843 वर ग्राहक संपर्क साधू शकतात. बनावट कॉल्स अथवा संदेशाची माहिती राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्र. 1930 वर द्या किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा असेही महानगरकडून स्पष्ट करण्यात आले.
Pune Crime: पुण्यात शेल कंपन्यांच्या माध्यमातून ४,४२७ कोटी परदेशात; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा
एमजीएलने स्पष्ट केले की, एमजीएलचे प्रतिनिधी हे कधीही फोन कॉल्स, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेश या माध्यमातून तपशील, ओटीपी, कार्ड क्रमांक किंवा पासवर्ड्स अशा व्यक्तिगत आर्थिक माहितीची विचारणा करत नाहीत. ते ग्राहकांना कधीही एपीके फाइल्स डाउनलोड करण्यास आणि अज्ञात किंवा संशयास्पद लिंक्सवर क्लिक करण्यास सांगत नाहीत.
दरम्यान, सायबर भामट्यांकडून फसवणूक होऊ नये म्हणून विविध कंपन्यांसह केंद्र व राज्य सरकारही प्रयत्नशील आहेत. त्यांच्याकडून तशाप्रकारची माहितीही पसरवण्यात येत आहे. तसे असले तरी काही नागरिक अद्याप सायबर फसवणुकीच्या घटनांना बळी पडत असून त्यांनी तातडीने सायबर गुन्हे कक्ष किंवा जवळच्या पोलीस स्थानकात तक्रार नोंदवावी असे महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात आले आहे.