Crime News Live Updates
21 Aug 2025 03:30 PM (IST)
बीड जिल्ह्याच्या वडवणी येथील न्यायालयात सत्काराच्या शालनेच गळफास घेत सरकारी वकिलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडल होती. आता याप्रकरणी आत्महत्या केलेल्या सरकारी वकील व्ही.एल. चंदेल यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता, त्यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी आम्हाला दाखवली नाही. त्या चिठ्ठीत नेमका काय उल्लेख आहे, तो आम्हाला माहिती नाही. परंतु, जे कुणी यात दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंदेल कुटुंबीयांनी केली आहे.
21 Aug 2025 03:10 PM (IST)
गोंदियाच्या नवेगावबांध येथे चोरट्यांनी उच्छाद केला होता. गेल्या आठवडाभरापासून घरफोडी, मोबाईल दुकानात चोरी, पानटपरी फोडून चोरी अशा गुन्ह्यांची नोंद पोलिस ठाण्यात झाली होती. अखेर पोलिसांनी याप्रकरणी चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. कुणाल तरोणे (रा.नवेगावबांध) यांचे नवेगावबांध येथील बसस्थानकाजवळ गुरुकृपा मोबाईल शॉपी नामक दुकान आहे. त्यांच्या दुकानातील अँड्राईड मोबाईल आणि इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी 3 ऑगस्टच्या रात्री चोरून नेले होते. ही बाब ४ ऑगस्टला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणाची तक्रार नवेगावबांध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, याप्रकरणात लक्ष घालून पोलिसांनी आश्रमशाळेत शिकणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ते विद्यार्थी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एरंडी येथील आश्रमशाळेतील आहेत.
21 Aug 2025 02:55 PM (IST)
हल्ली आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ज्यामध्ये चोरटे सर्वात जास्त लक्ष जेष्ठ नागरिकांना करत आहे. अनेकदा हे चोरटे एसएमएस किंवा ऑनलाईन वेबसाईटद्वारे जेष्ठ नागरिकांना फसवत असतात. आता तर लोकप्रिय व्यक्तींच्या नावाने सुद्धा नागरिकांची लाखोंची फसवणूक केली जाते. अशीच एक घटना नवी मुंबईत घडली आहे, जिथे विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने एका वृद्ध महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. कोपरखैरणेतील एका महिलेला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तब्बल 21 लाखांची फसवणूक केली आहे. 74 वर्षीय वृद्ध महिलेला वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने फोन करून, सीबीआय चौकशीची तसेच डिजिटल अरेस्टची भीती घालून महिलेची 21 लाखांची फसवणूक केली आहे.
21 Aug 2025 02:35 PM (IST)
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारा गावात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कौटुंबिक कलह, संशय आणि पैशाच्या तगाद्यातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली. या भयानक कृत्यानंतर आरोपी पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. नितीन शिंदे असे आरोपी पतीचे नाव असून, त्याने मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या पत्नी कवितावर धारदार शस्त्राने निर्दयीपणे हल्ला केला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असलेल्या नितीनने तिला वारंवार मारहाण केली होती. याशिवाय घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्याचा तो तगादा लावत होता. या वादातूनच त्याने पत्नीचा जीव घेतला, अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
21 Aug 2025 02:10 PM (IST)
राजधानी दिल्लीत एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (20 ऑगस्ट) दक्षिण दिल्लीतील खरक रिवाडा गावात घडली. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सिद्धार्थ असं नाव असलेल्या मुलाने आई, वडील आणि भावाची हत्या केल्याची ही घटना आहे.
21 Aug 2025 01:50 PM (IST)
बनावट सोने खरे असल्याचे भासवून ते सराफ व्यवसायिकांना देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे, त्यांच्याकडून काळेपडळ, चंदनगर, पर्वती आणि आंबेगाव अशा चार पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांचा छडा लागला आहे. तर तीन लाख रुपयांची रोकड, एक लाख रुपय किंमतीचे मोबाईल चार लाख रुपये किंमतीचे हॉलमार्क असलेले बनावट दागिने असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहीत संजय गोरे (वय ३०, रा. धनकवडी), अजय दत्तात्रय पवार (वय २८), ओम सुंदर खरात (वय २३, रा.दोघे वडगावबुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. तर त्यांना बनाट सोन्याचे दागिने पुरविणाऱ्या मुंबईच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
21 Aug 2025 01:30 PM (IST)
पुणे शहर पोलिस दलात नव्याने दाखल झालेल्या ‘मोबाईल सर्वेलन्स व्हॅन’ आणि ‘ड्रोन फ्लॅग ऑफ’च्या मदतीने लपून-छपून तसेच जमिनीच्या आतमध्ये हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन कारवाई करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांनी प्रथमच कारवाई केली असून, परिमंडळ चारमधील वेगवेगळ्या भागात ही कारवाई करत १६ गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी तब्बल ३६ हजार ७३५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी, चंदननगर, वाघोली व येरवडा पोलिस ठाण्यात प्रत्येकी २, खडकी व खराडी पोलिस ठाण्यात प्रत्येकी १, विमानतळ व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी ३ असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कारवाईत ८५ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
21 Aug 2025 01:10 PM (IST)
एक मोठी बातमी समोर आली आहे. दारू पित असताना पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी चिंचवड येथील ऑरा हॉटेलमध्ये घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. फिर्यादी सूरज रामदास घोडे (२५, रा. घरकुल, चिखली) यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आशुतोष सुदाम कदम (२८, रा. घरकुल, चिखली), राजा युवराज हजारे (२८, रा. घरकुल, चिखली) आणि शैलेश शाम गायकवाड उर्फ बन्या (३०, रा. थेरगाव) यांना ताब्यात घेतले आहे.
21 Aug 2025 12:50 PM (IST)
पिंपरी-चिंचवडमध्ये हुंड्याच्या छळामुळे आणखी एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींवर याप्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिव्या हर्षल सूर्यवंशी असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील W-57 सोसायटीत 26 वर्षीय दिव्या हर्षल सूर्यवंशी हिचा राहत्या घरात गळफास लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही आत्महत्या नसून खून असल्याचा गंभीर आरोप दिव्याच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी दिव्याचे पती हर्षल शांताराम सूर्यवंशी आणि सासरच्या मंडळींविरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
21 Aug 2025 12:31 PM (IST)
राज्याजह देभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरटे वेगवेगळ्या भागात नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून एक चोरीसंदर्भात बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रवासी महिलेला मदतीचा बहाणा करून तिच्या बॅगेतील सोन्याच्या बांगड्या, अंगठी चोरून पसार झालेल्या चोरट्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. चोरट्याचे पुणे आणि मिरज रेल्वे स्थानकात प्रवाशांकडील ऐवज चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून ११० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रमेश उर्फ मोटा पिता फूलचंद (रा. न्यू अनाज मंडी, नजफगड, दिल्ली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अतिरिक्त अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इरफान शेख, सहायक निरीक्षक प्रभाकर कापुरे, उपनिरीक्षक सुनील माने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
बीडच्या परळी तालुक्यातील रत्ननगर तांड्यात एका तरुणाची प्रेमप्रकरणाच्या संशयावरून कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत तरुणाचे नाव भीमराव शिवाजी राठोड असून, आरोपीचे नाव अनिल चव्हाण आहे, जो घटनास्थळावरून अद्याप फरार आहे.