विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
भंडारा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, आत्महत्या यांसारख्या घटना समोर येत आहेत. असे असताना आता भंडारा शहरात नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रेरणा शामराव खोब्रागडे (वय १९, रा. पंचवटी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. प्रेरणा ही मागील दीड वर्षांपासून साकोली येथील मामा कन्नन मनीकंम मुदलियार (रा. पंचशील वॉर्ड, साकोली) यांच्या घरी राहून नर्सिंगचे शिक्षण घेत होती. मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ती घरातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
हेदेखील वाचा : हरियाणात मृतदेह सापडला! ३ पोस्टमॉर्टम रिपोर्ट, CBI चौकशीची मागणी आणि लॉरेन्स बिश्नोईची नोंद…,मनीषाच्या मृत्यूचे गूढ कधी उलगडणार?
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतिभा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येमागील कारण समजून घेण्यासाठी चौकशी सुरू असून या दुर्दैवी प्रकारामुळे साकोलीत हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्यार्थी व पालकवर्गातही चिंता व्यक्त केली जात आहे.
सुसाईड नोट सापडली अन्…
प्रेरणा खोब्रागडे हिने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून, त्यात तिने स्पष्टपणे “मी स्वतः आत्महत्या करते” असा उल्लेख केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाइकांवर शोककळा पसरली असून, शिक्षणाच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणीने आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, ससून रुग्णालयाच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३, रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.