टोळीप्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना केले तडीपार; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
पुणे : पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर ऐन सणासुदीत संक्रात आणली असून, लोणीकाळभोर, कोंढवा तसेच वानवडी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्ड़वरील तब्बल दहा सराईत गुन्हेगारांवर एकाचवेळी तडीपारीची कारवाई केली आहे. त्यांना शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा परिक्षेत्रातून तडीपार केले आहे. त्यात टोळीप्रमुख व सदस्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिले आहेत. आगामी काळातील सण- उत्सव तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रतिबंधक आळा घालण्याच्या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
अनिकेत गुलाब यादव (वय. २२ रा. कदमवाकवस्ती लोणीकाळभोर), प्रसाद उर्फ बाबु धनाजी सोनवणे (वय. २१, रा. थेऊर), विश्वजित भिमराव गायकवाड (वय. ४०, रा. कोंढवा खुर्द), टोळीप्रमुख करीम सय्यदअली सौदागर उर्फ लाला (वय. २९), शाहरुख रमजान पठाण उर्फ फतेह (वय. २५), अझहर बशीर शेख (वय. ३५), अझहर इरफान सदस्य उर्फ अज्जु (वय. २८,राहणार सर्व कोंढवा परिसर), टोळीप्रमुख राहूल उर्फ विकी रामु परदेशी (वय.३५), विशाल राजू सोनकर (वय.२६), सुनिल रामू परदेशी (वय. ३०, राहणार सर्व वानवडी गाव) अशी या आरोपींची नावे आहेत.
तडीपार केलेले आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर बेकायदा जमाव जमविणे, शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे, जबरी चोरी, दरोडा, पिस्तूल बाळगणे, दरोड्याची तयारी, गावठी दारुची विक्री, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
३१ तडीपार; ११४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
१ जानेवारी २०२५ पासून परिमंडळ पाचच्या हद्दीतून ३१ सराईतांवर तडीपारीची कारवाई केली आहे. ११४ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक करवाईचा बडगा उगारला आहे. तसेच १६ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. तर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियमानुसार (मोक्का) दहा कारवायामध्ये ६७ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे.
सराफाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
बनावट सोने खरे असल्याचे भासवून ते सराफ व्यवसायिकांना देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे, त्यांच्याकडून काळेपडळ, चंदनगर, पर्वती आणि आंबेगाव अशा चार पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांचा छडा लागला आहे. तर तीन लाख रुपयांची रोकड, एक लाख रुपय किंमतीचे मोबाईल चार लाख रुपये किंमतीचे हॉलमार्क असलेले बनावट दागिने असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहीत संजय गोरे (वय ३०, रा. धनकवडी), अजय दत्तात्रय पवार (वय २८), ओम सुंदर खरात (वय २३, रा.दोघे वडगावबुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. तर त्यांना बनाट सोन्याचे दागिने पुरविणाऱ्या मुंबईच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक वाहीद पठाण व त्यांच्या पथकाने केली आहे.