Crime News Live Updates
मुंबईतील शिवाजीनगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका आईनेच आपल्या पोटच्या 6 महिन्याच्या चिमुरड्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. गोवंडीच्या बैंगणवाडीतील ही घटना घडली आहे. गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरात आरोपी महिला राहत असून तिने मुल झोपलेले असताना उशीने मुलाचे तोंड दाबून हत्या केली. या हत्येनंतर महिला स्वत: पोलिस ठाण्यात गेली आणि तिने केलेल्या चिमुकल्या जिवाची हत्येची कबूली पोलिसांना दिली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी महिला सुलताना अब्दुल खान हिच्या विरोधात कलम 103 भा न्या सं अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस अधिक तपास करत आहेत.
02 Aug 2025 05:55 PM (IST)
वडगाव मावळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून वडगाव मावळ येथील २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना २४ जुलै रोजी घडली असून, याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. रणजित देशमुख आणि अभिषेक ढोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, प्राण येवले याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
02 Aug 2025 05:40 PM (IST)
सिद्ध भाजे धबधबा आणि विसापूर किल्ला परिसरात पुन्हा एकदा धोकादायक पर्यटनाचा बळी गेला आहे. भाजे धबधब्यापासून विसापूर किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक तरुण पाय घसरून दरीत कोसळल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तातडीने शोधमोहीम राबवली. मात्र गंभीर जखमांमुळे त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
02 Aug 2025 05:22 PM (IST)
माण तालुक्यातील दहिवडी व परिसरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात दहिवडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रविण बापुराव चव्हाण, प्रशांत बापुराव चव्हाण, विकास तानाजी चव्हाण, सुमीत रामचंद्र पाटोळे, अनिल नंदकुमार दळवी, मुकेश आबा अवघडे, सौरभ संतोष अवघडे, गोरख संजय चव्हाण, अजय आनंदा चव्हाण व एक विधीसंघर्ष बालक (सर्व रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
02 Aug 2025 05:12 PM (IST)
US-Russia conflict: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ अशी टीका केली होती. यावर रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्यानंतर अमेरिका-रशिया संघर्ष पुन्हा उफाळल्याचे संकेत दिसू लागले आहेत. अमेरिकेने आपल्या दोन अणु पाणबुड्या मोक्याच्या जागांवर पाठवण्याचे आदेश दिले असून हे पाऊल थेट शीतयुद्धकालीन रणनीतीची आठवण करून देणारे आहे.
02 Aug 2025 05:05 PM (IST)
दौंड तालुक्यातील यवतमध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. जमाबंदीचा आदेश पोलिसांनी लागू केले आहेत, तर ज्यांनी काल दगडफेक केली. जाळपोळ केली, त्यांना पोलीस आयडेंटिफाय करून ताब्यात घेत आहेत. यवतची आज बाजारपेठ बंद आहे. यवत गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांची गाडी देखील गावातून जमाव बंदीचा आदेश असल्याचे सांगत आहे. काल (शुक्रवारी) झालेल्या तणावानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात देखील घेतलं आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत यवत गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. तसेच बाजार पेठ बंद ठेवण्यात आली आहे.
02 Aug 2025 04:45 PM (IST)
इस्लामपूर शहरात भरदिवसा तिघा जणांनी एका रेकॉर्डवरील गुंडाचा पाठलाग करत त्याची धारदार हत्यारांनी वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर तिन्ही संशयित पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. आर्थिक वादातून ही खुनाची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रोहित पंडित पवार असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. रोहित आणि हल्लेखोरांमध्ये आर्थिक देवघेवीच्या कारणातून वाद होता.
02 Aug 2025 04:30 PM (IST)
रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात 31 जुलै संध्याकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली होती. घरात एकटे असलेल्या 72 वर्षीय वृद्धाचा गळा चिरून डोक्यात लोखंडी रॉडने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. प्रथमदर्शनी हा प्रकार अनोळखी व्यक्तीने केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलीस तपासामध्ये खऱ्या आरोपीची ओळख पटली. हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून, मृत वृध्द व्यक्तीचाच नातू निघाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
02 Aug 2025 04:11 PM (IST)
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर एका आठवड्यात मृत्यूचे संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यावर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. 30 जुलै रोजी म्हणजेच दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याच आदेशान्वये परभणीच्या नवा मोंढा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
02 Aug 2025 04:07 PM (IST)
वाराणसी: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वाराणसीत होते. त्यांनी आज वाराणसीमध्ये ५१ वा दौरा केला. पंतप्रधान मोदी यांनी आज ५२ प्रकल्पांचे उदघाट्न आणि शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. यासाठी केंद्र सरकारने २,१८३ कोटी निधी दिला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेला संबोधित केले. सभेला संबोधित करताना पंतपधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेसवर टीका केली.
02 Aug 2025 03:52 PM (IST)
उल्हासनगर कॅम्प १ मधील साईबाबा मंदिर परिसरात १ ऑगस्ट रोजी सायंकाळी साजिद शेख आणि रोहित पासी यांची भेट झाली. याआधी दोघांमध्ये वाद झाले होते, जे मिटवण्यासाठी ते पुन्हा एकत्र आले. मात्र चर्चेने वाद शमण्याऐवजी ते अधिकच उग्र झाले.त्या रात्री अडीचच्या सुमारास साजिदच्या मित्राला रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जीनवाल यांनी अडवलं आणि साजिदला फोन करून बोलावून घेतलं. साजिद आपल्या मित्राला मदत करण्यासाठी तिथे पोहोचला, आणि तिथे आधीपासूनच थांबलेल्या १५ ते २० जणांच्या टोळक्यानं त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करत हत्या केली.ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी रोहित पासी आणि प्रवीण उज्जीनवाल यांना अटक केली असून, इतर आरोपी फरार आहेत.
02 Aug 2025 03:46 PM (IST)
कर्जत तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. हा हल्ला केवळ एका पत्रकारावर नसून तो लोकशाही व्यवस्थेवरच केलेला हल्ला असल्याची तीव्र भावना तालुक्यातील सर्व पत्रकारांनी व्यक्त केली आहे.
02 Aug 2025 03:42 PM (IST)
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे राज्यातील वेगवेगळ्या भागात लाखो रुपयांवर डल्ला मारत आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असताना आंबेगाव पोलिसांनी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन लाखांच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. सुरेंद्र सुखदेव झुरंगे (वय १९, रा. खळद, ता. पुरंदर), सुयश सुनिल दुधाळ (वय १९) व प्रज्वल गंगाधर टिळेकर (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांनी आंबेगाव व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे.
02 Aug 2025 03:25 PM (IST)
मोदी गणपती शेजारी तसेच महापालिकेच्या वाहनतळाच्या परिसरात सुरु असलेल्या बड्या जुगार अड्ड्यावर विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आहे. या छाप्यात सहायक पोलीस फौजदारच जुगार खेळताना सापडला असून, त्यासोबतच प्रविण बोदवडे, विजय महाडिकसह ३३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जुगार खेळणाऱ्या सहाय्यक फौजदार यांना पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.
02 Aug 2025 03:05 PM (IST)
आयशर टेम्पोने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (३० जुलै) सकाळी मारुंजी रोडवर घडली. विद्या काळुराम जाधव (वय ४७) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी काळुराम गुलाब जाधव (वय ५२, मेमाणेवस्ती, नेरे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक प्रवेश यादव (वय २५, वापी, गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
02 Aug 2025 03:00 PM (IST)
बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामतीहून इंदापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका तरुणाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. या हल्ल्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला असून हा सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे.
02 Aug 2025 02:50 PM (IST)
बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (३१ जुलै) रात्री चाकण बस स्टँडजवळ करण्यात आली. संतोष मच्छिंद्र टोपे (२८, वाकी बु, खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल सूर्यवंशी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष टोपे याने त्याच्या ताब्यात एक कोयता बेकायदेशीरपणे बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.
02 Aug 2025 02:30 PM (IST)
जुन्या भांडणाच्या कारणावरून पती-पत्नीला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (३१ जुलै) रात्री काळेवाडी येथील श्रीकृष्ण कॉलनीमध्ये घडली.गौडाप्पा हनुमंतराय पाटील (३९, कोकणेनगर, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मल्लिनाथ विजयकुमार पाटील (कोकणेनगर, काळेवाडी) आणि सुनील इरन्ना पाटील (घरकुल, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीच्या घरासमोर येऊन त्यांना व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी मल्लिनाथ याने लोखंडी फायटरने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
02 Aug 2025 02:10 PM (IST)
गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला अटक केली. तिच्याकडून ३८२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (३१ जुलै) दुपारी ओटास्किम निगडी येथे करण्यात आली. ओटास्कीम निगडी येथील ४७ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गोविंद डोके यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम निगडी येथे एक महिला गांजा विकत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत महिलेला ताब्यात घेतले. महिलेच्या ताब्यातून १९ हजार ८१० रुपये किमतीचा ३८२ ग्रॅम वजनाचा गांजा तसेच काही रोख रक्कम जप्त केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
02 Aug 2025 01:50 PM (IST)
पुण्यातील वाघोली भागातील केसनंद परिसरात चुलत भावावरच जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून, गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुशील संभाजी ढोरे (वय ४२ वर्षे,रा. ढोरेवस्ती, केसनंद,नगर रस्ता) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन राजाराम ढोरे, गणेश चंद्रकांत जाधव, भिवराज सुरेश हरगुडे (तिघे रा. केसनंद, नगर रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
02 Aug 2025 01:30 PM (IST)
भरदुपारी घरात घुसून कुटुंबाला सुरा दाखवत साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या तसेच भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या सख्या भावांची टोळीला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने, सुरा व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टोळीचे दौंड, बारामती, इंदापूर, सुपा, जेजुरी, शिरूर आणि रांजणगाव हद्दीतील १९ विविध गुन्हे उघडकीस आले आहेत. योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले (वय २४), सचिन ईश्वर भोसले (वय ३९), गहीनीनाथ ईश्वर भोसले (वय २९) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, उर्वरित मिलन उर्फ मिलिंद भोसले, धोंड्या उर्फ युवराज भोसले, सोन्या भोसले यांची नावे समोर आली आहेत. त्यांनाही अटक केली. ही कारवाई अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
02 Aug 2025 01:30 PM (IST)
सोलापूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून सावत्र आईने ३ वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे उघडकीस आली आहे. मुलीचा छळ आणि तिच्या मृत्यूमागील क्रूरता समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
02 Aug 2025 01:10 PM (IST)
अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिली. या तरुणाला मंदिर उडवण्यासाठी 1 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली असून, कटात सहभागी होण्यासाठी आणखी 50 लोकांची आवश्यकता असल्याचेही मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या तरुणाने शिरूर कासार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक मेसेज आला. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दिली. आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाठी संशयीने कराचीतील लोकेशनही तरुणाला पाठवले. शिवाय कटात सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर दिली. या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक लाख देऊ तर मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असे संशयिताने मेसेजद्वारे सांगितले आहे.
02 Aug 2025 12:55 PM (IST)
पुणेकरांना मदत अन् पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्तांनी सुरू केलेल्या 'कॉप्स २४'च्या दोन पोलिसांनाच रात्र गस्तीवर असताना दुचाकीस्वार टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेशिस्त गाडी चालविताना दुचाकीस्वार चालकाला अडविल्यानंतर चौघांनी त्यांना मारहाण केली आहे. अक्षरश: रस्त्यावर खाली पाडून ही मारहाण केली गेली आहे. नंतर टोळके पसार झाले आहे. पुणेकरांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनाच मारहाण झाल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालल्याचे समोर आले आहे.
02 Aug 2025 12:55 PM (IST)
सांस्कृतिक आणि शिक्षणाच्या नगरीला गालबोट लावत बदनामी आणि शहराचे स्वस्थ बिघडवणाऱ्या नाईट लाईफ, पब व हायप्रोफाईल पार्ट्यांवर पुणे पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. गेल्या चार वर्षात पुणे पोलिसांनी पुण्यात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या तब्बल ७०५ पेडलरांना दणका देत त्यांना जेरबंद केले आहे. कारवाईचा जोर वाढविला असला तरी पुण्यात कोकेन तसेच एमडी आणि गांजा या ड्रग्जचा पुरवठा येत असल्याचेच काही प्रकरणांवरून दिसत आहे. यातही गांजाची पाळेमुळे चांगली रोवली गेल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार वर्षात ड्रग्ज पार्ट्यांमुळे तसेच उत्पादन व विक्रीमुळे पुणे चर्चेत राहत आहे. पबमधील पार्ट्यांत सहज उपलब्ध होत असलेला ड्रग्ज रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. नोकरदार तरुणाई, उच्चभ्रू पोलिसांच्या पब कारवाईनंतर हाऊस पार्टीवर भर देऊ लागले आहेत. हे प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. पण, यामुळे पुण्याचे स्वास्थ बिघडत चालले आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशा पार्ट्यांसोबतच ‘पेडलर’ यांच्यावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
02 Aug 2025 12:37 PM (IST)
माणूस हे तर सांगू शकतो की त्याचा जन्म कधी झाला, पण त्याचा मृत्यू कधी होईल? हे त्याला सांगता येत नाही. पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. चिंचवडगावातील नायट्रो जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिलिंद कुलकर्णी (वय ३७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना जिममधील सीसीटीव्हीमध्येही कैद झाली असून, शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
02 Aug 2025 12:20 PM (IST)
राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, खून, मारामाऱ्या, लुटमार यासारख्या घटना दररोज घडत आहेत. अशातच आता बारामतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामती- इंदापूर या संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर धावत्या एसटीमध्ये माथेफिरुने एकावर कोयत्याने वार करून स्वतःवरही वार करण्याचा प्रयत्न केला आहे, यानंतर एसटी बसमधून उतरून हातात कोयता घेऊन महामार्गावरून चालणाऱ्या या माथेफिरूला जीवाची बाजी लावून पोलीस कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले आहे. ही घटना बारामती तालुक्यातील काटेवाडी परिसरातील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर घडली आहे.
02 Aug 2025 12:05 PM (IST)
पुणे जिल्ह्यातून एक अपघाताची घटना समोर आली आहे. औषधी आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर काळाने घाला घातला आहे. भरधाव मिक्सरखाली आल्याने ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (दि.१) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील पिके चौकात हा अपघात झाला आहे. पंडितराव माधवराव समर्थ (वय ६६, रा.बिजलीनगर,चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
02 Aug 2025 11:55 AM (IST)
बेशिस्त वाहन अन् अतिवेगात पुण्यात अपघाती मृत्यू वाढलेले असतानाच रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खड्यांमुळे दुचाकीचालक ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर पडल्यानंतर शेजारून निघालेल्या कारचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले आणि त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जगन्नाथ काशिनाथ काळे (वय ७३, रा.औंध) असे मृत्यू झालेल्या जेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना नागरस रोड हॉटेल राहुल समोर भाले चौकाकडे जाणार्या रस्त्यावर घडली आहे. दरम्यान, अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
02 Aug 2025 11:50 AM (IST)
पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, लॉ कॉलेज रस्त्यावरील एका ज्येष्ठाचा फ्लॅट फोडून पावणे ५ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. त्यासोबतच विश्रांतवाडीत देखील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी २८ हजारांचा ऐवज चोरला आहे. लॉ कॉलेज रस्त्यावरील फ्लॅटमध्ये चोरी झाल्याप्रकरणी ७४ वर्षीय ज्येष्ठाने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. ही घरफोडीची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे लॉ कॉलेज रस्त्यावरील शांतीलिला सोसायटीत राहतात. २९ जुलै रोजी ते घराला कुलूप लावून गेले होते. तेव्हा चोरटे मध्यरात्री सोसायटीत शिरले. त्यांचा बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, कपाटातील चांदीच्या वस्तू, कॅमेरा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण साठविणारे ‘डीव्हीआर’ चोरून नेले. बुधवारी ज्येष्ठ नागरिक घरी परतले. तेव्हा चोरी झाल्याचे दिसून आले. नंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. उपनिरीक्षक चांदणी शेंडे तपास करत आहेत.
02 Aug 2025 11:50 AM (IST)
पश्चिम बंगालमध्ये मागील वर्षी झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही कारवाई NIAच्या पथकाने नाशिक पोलिसांच्या मदतीने केली आहे. 2024 मध्ये पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यातील मुख्य आरोपी 7 ते 9 महिन्यापासून नाशिकमध्ये वेषांतर करून राहत असल्याची माहिती NIA ला मिळाली होती. त्यानुसार पश्चिम बंगालचे पथक मागील महिन्यात नाशिकमध्ये दाखल झाले होते. सातपूर MIDC परिसरात सतत दोन दिवस तपास करून नाशिक क्राईम ब्रँचच्या मदतीनें हि कारवाई करण्यात आली आहे.
02 Aug 2025 11:49 AM (IST)
पुण्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलीस शिपायांवर चार जणांच्या टोळीने अचानक हल्ला केल्याची धक्कदायक घटना घडल्याचे समोर आली आहे. ही घटना चर्च चौक खडकी येथे ३१ जुलैच्या रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण भीतीचा वातावरण निर्माण झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चार जणांना खडकी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
02 Aug 2025 11:48 AM (IST)
मुंबई मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. IIT बॉम्बेच्या हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी (1 ऑगस्ट ) मध्यरात्री घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
02 Aug 2025 11:34 AM (IST)
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे खंदारे वस्तीवर एका 65 वर्षीय वृद्धाने 60 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत धारदार कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली. यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो फोल ठरला. ही घटना गुरुवारी (दि.31) मध्यरात्री एकच्या सुमारास उघडकीस आली आहे. दगडू लक्ष्मण खंदारे असे आरोपीचे नाव असून, चंद्रकला खंदारे यांची त्याने हत्या केली.