महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाच्या कारवाईत, ७.५६ कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणी एकाला अटक
मुंबई : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने कर चुकवणाऱ्या फर्मविरुद्ध केलेल्या विशेष चौकशी मोहिमेअंतर्गत ३ सप्टेंबर २०२५ रोजी मेसर्स केपी क्रिएशन वर्ल्ड या फर्मचे मालक अंकित महेंद्रकुमार गांधी (वय-३६ वर्षे) यांना ७.५६ कोटीची कर चोरी प्रकरणी अटक केली असल्याचे राज्य कर उपआयुक्त अन्वेषण – क यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.
बनावट इनव्हॉइसमध्ये सहभागी असलेल्या करदात्याविरुद्ध महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने सुरू केलेल्या विशेष कारवाईचा भाग म्हणून मेसर्स केपी क्रिएशन वर्ल्डच्या बाबतीत चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान, अंकित महेंद्रकुमार गांधी यांनी वस्तूंच्या कोणत्याही हालचाली / व्यवहार शिवाय, अस्सल/अस्तित्वात नसलेल्या करदात्यांकडून ७.५६ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळवले असल्याचे आढळून आले.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मुंबई यांनी अंकित महेंद्रकुमार गांधी यांना १७ सप्टेंबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज्य कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त दिप्ती एन. पिलारे, संतोष डी. लोंढे आणि संतोष आर. खेडकर यांनी राज्य कर निरीक्षक/कर सहाय्यकांसह ही कारवाई केली. मोहीम, राज्य कर सहआयुक्त, अन्वेषण क विभाग, मुंबई व यास्मीन अ. मोळकर राज्य कर उपायुक्त, अन्वेषण-क विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.
वित्तीय वर्ष २०२५-२६ मधील ही २५ वी अटक असून, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने पुन्हा एकदा करचोरी करणाऱ्या व्यक्ती, वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष व्यवहार न करता फसव्या नोंदी दाखवणाऱ्या, बनावट चलनं तयार करणाऱ्या व खोटी इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घेणाऱ्या व दुसऱ्यांना देणाऱ्या व्यक्तींना या कारवाईतून कडक इशारा दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र जीएसटी विभागाने मोठी कारवाई करत देवरा एक्झिम एलएलपी या फर्मच्या करचुकवेगिरी प्रकरणात भागीदार मेहुल जैन आणि ऑपरेटर कमलेश जैन यांना अटक केली आहे. दोघांवर तब्बल 30.52 कोटींच्या चुकीच्या इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) वजावटीचा आरोप आहे. या गैरप्रकारामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसला आहे.
विशेष म्हणजे, या वजावटीसाठी कोणताही वास्तविक व्यापार न होता बनावट व्यवहार दाखवले गेले, अशी माहिती महाराष्ट्र राज्यकर विभागाने दिली. या गंभीर प्रकरणात न्यायालयाने आरोपींना 4 सप्टेंबर 2025 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई राज्यकर विभागाचे सहआयुक्त संजय पवार आणि उपायुक्त स्वप्नाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सतीश पाटील, शरदचंद्र पोहनकर, भूपेन्द्र वळवी, मनोहर कनकदंडे यांचा समावेश होता.