संग्रहित फोटो
सातारा : हक्क सोड पत्राची दस्तावर नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेणाऱ्या बोरगाव (तालुका कोरेगाव) येथील तलाठी रणजीत अर्जुन घाटेराव (वय ३२, सध्या राहणार श्री अपार्टमेंट, अहिरे कॉलनी, लक्ष्मीनगर, सातारा) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची टकले (ता. कोरेगाव) येथे गट नंबर १०० मध्ये ९० गुंठे शेत जमीन आहे. २३ डिसेंबर २०२१ रोजी तक्रारदारांच्या वडिलांचे निधन झाले. तक्रारदारांची भाऊ-बहीण स्वतः तक्रारदार यांची नावे सातबारावर नोंद झाली होती. तक्रारदार यांच्या बहिणीचे विना मोबदला हक्क सोड पत्र व भावाच्या नावे नोंद सह दुय्यम निबंधकांसमोर करून देण्यात आली होती. या हक्क सोडपत्राची नोंद सातबारा सदरी करून देण्यासाठी तलाठी घाटेराव यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १००० रुपये रोख देण्याचे ठरले व उर्वरित रक्कम नंतर देण्याचे चर्चेनुसार निश्चित झाले.
मंगळवारी (दि. ९ सप्टेंबर) तक्रारदारांच्या फिर्यादीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या निर्देशानुसार पोलिस निरीक्षक सुनील पाटील आणि त्यांच्या पथकाने तलाठी सजा परिसरात सापळा रचला. तलाठी घाटेराव यांना एक हजार रुपयाची लाच घेताना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस हवालदार नितीन गोगावले, सत्यम थोरात, अजयराज देशमुख आणि निलेश राजपुरे यांनी ही कारवाई केली.
हे सुद्धा वाचा : Laxman Hake : लक्ष्मण हाके यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत
गेल्या काही दिवसाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ९५ हजार रुपये स्वीकारतांना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल ३०६ अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी लाचेची मागणी केली होती. २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी नंतर ९५ हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. एसीबीने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना ताब्यात घेतले.