
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
मुंबई: मोठी कारवाई करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव घरकुल लाच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात ९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थेट कार्यमुक्त करण्यात आलं आहे. येथील भाजप आमदार राजेश पवार यांनी अचानक कार्यालयाला भेट दिली होती. नागरिकांना घरकुल मंजूर करण्यासाठी अधिकारी लाच मागत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे,आमदारांनी अचानक भेट दिली आणि हा भ्रष्टाचार उघड झालं. लाच घेतल्याचं काही अधिकारी आणि कर्मचारी यांनी मान्य केलं होत. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी थेट कार्यमुक्तीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे, लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
False Case Defence Tips: पत्नीने खोट्या गुन्ह्यात अडकवले तर….? असा करा स्वत:चा बचाव
पत्रात काय?
नांदेड मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाईचा पत्र जरी केला आहे. त्यानुसार, उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणांस कळविण्यांत येते की, 27 ऑक्टोबर रोजी 89-नायगांव विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार, यांनी पंचायत समिती, नायगांव कार्यालयास भेट दिली. त्यावेळी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, डाटा एन्टी ऑपरेटर व इतर अधिकारी घरकुल लाभार्थ्यांचे देयके काढण्यासाठी पैसे घेतात व जाणून बुजून तांत्रिक अडचण दर्शवून विलंब करतात, अशी कबुली देऊन स्वतः मान्य केल्याची व्हिडीओ क्लिप प्रसारमाध्यमांच्या स्वरुपात व्हायरल झालेली आहे. या व्हायरल व्हिडिओ क्लिपची दखल घेत पंचायत समितीमधील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
89-नायगांव विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार यांच्या समोर आपण असे स्पष्ट केलेले आहे की, घरकुल लाभार्थ्याकडून आपण लाच घेता, हे व्हिडीओ क्लिपमध्ये स्पष्टपणे मान्य केलेले आहे. त्यामुळे आपणास ग्रामीण गृहनिर्माण अभियंता या पदावरुन कार्यमुक्त करण्यात येत आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई
कार्यमुक्तीची कारवाई ९ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्यांचे नाव अर्जुन प्रभाकरराव जाधव, शेख समिर, ओमप्रकाश विश्वनाथ पांडागळे, सुजित शिवराम दाताळकर, धोंडीबा मारोती उपासे, आडे संतोष किशन, ऋषिकेश नामदेव सरादे, मोहम्मद इब्राहिम, संतोष माधवराव वडजेंसह नायगांव पं.समितीमधील सर्व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, यांचा समावेश आहे.
पवारांनी दिला इशारा
घरकुल लाच प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा राजेश पवार यांनी दिला आहे. तसेच, अधिवेशन काळात सभागृहात देखील हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं आमदार पवार यांनी सांगितलं. येथील कार्यालयात 9 इंजिनिअर आणि 3 कॉम्प्युटर ऑपरेटरने लाच घेतल्याची कबुली आमदार राजेश पवार यांच्यासमोर दिली होती.