सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मुंबई : ठाकरे गटाचे नेते प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करताना झाडलेली एखादी गोळी खुद्द आरोपीलाच लागली असण्याची दाट शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे या हल्ल्यात फरार असलेला संतोष उर्फ टल्ली कनोजिया जखमी झाल्याचा संशय आहे. तर पाचवा अनोळखी आरोपीचा शोध आता पोलिसांकडून युद्धपातळीवर घेतला जात आहे.
याचदरम्यान संशयित शूटर्ससह आणखी दोघांना गुरुवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मंगळवारी रात्री पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. पूर्णकर यांचे कार्यालय आकाराने लहान आहे. अत्यंत जवळून गोळीबार करताना एखादी गोळी भिंतीवर किंवा इतर वस्तूवर आदळून उलट (रिव्हर्स) दिशेने आरोपीलाच लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घटनेच्या वेळी उपस्थित आरोपींपैकी कोणी जखमी झाले आहे का? आणि त्याने ठाणे, मुंबई परिसरातील खासगी अथवा सरकारी रुग्णालयात गुपचूप उपचार घेतले आहेत का? या दृष्टीने पोलिसांनी सर्व रुग्णालयांचे रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली आहे.
अटक आरोपींची कसून चौकशी सुरू
घटनास्थळी आरोपींनी नेमक्या किती गोळ्या झाडल्या, याबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. अटक केलेल्या तिघांच्या कसून चौकशीतून गोळीबाराचा अचूक तपशील आणि हत्येसाठी वापरलेली शस्त्रे जप्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. गोळी लागून जखमी झालेल्या आरोपीचा माग काढल्यास या हत्याकांडामागील उर्वरित आरोपी आणि मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे पोलिसांना सहज शक्य होणार आहे.
हेल्मेटधारी अज्ञात आरोपी अद्याप फरार
पूर्णेकर यांचे माजी सहकारी आणि नंतर प्रतिस्पर्धी बनलेले पप्या शिंदे याला पोलिसांनी आधीच अटक केली होती. त्यानंतर एसआयटीने मुंबई-गोवा महामार्गावरून कर्नाळा येथे सापळा रचून निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात सहभागी असलेला संतोष कनोजिया ऊर्फ ‘टल्ली’ आणि हेल्मेट परिधान केलेला एक अज्ञात हल्लेखोर अद्याप फरार असून, त्यांचा कसून शोध सुरू आहे, अशी माहिती एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.






