
पुण्यात दहशतवादविरोधी पथकाची मोठी कारवाई; संशयित दहशतवाद्याला बेड्या
पुणे : दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) अनेकदा कारवाई केली जात आहे. असे असताना आता पुण्यासह पिंपरी-चिंचवड भागात तब्बल 19 ठिकाणी राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) छापेमारी करत मोठी कारवाई केली. या कारवाईत पुण्यातून एका संशयिताला पथकाने ताब्यात घेतले.
पुण्यात 19 ठिकाणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) छापेमारी करत काही जणांकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. त्याच्या विश्लेषणाअंती अखेर एटीएसने बंदी असलेल्या अल-कायदाशी संबंध आलेल्या संशयित दहशतवाद्याला पुणे रेल्वेस्टेशन परिसरातून कुर्ला-बेंगलोर एक्स्प्रेस या रेल्वेतून उतरण्यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांनी कोथरूडमधून दुचाकी चोरीप्रकरणातून देशात रचलेला मोठा दहशतवादी हल्ला उघडकीस आणला होता. पुढे याच प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनी दहशतवादी करवाईची साखळी उघडकीस आणली होती.
दरम्यान, एटीएसने याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. तपासाच्या अनुषंगाने नंतर राज्य दहशतवादविरोधी पथक व पुणे विभागाने 15 दिवसांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 18 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली होती. भोसरी, कोंढवा, खडकी आणि वानवडी या परिसरात 19 संशयित ठिकाणी कारवाईकरून आक्षेपार्ह दस्ताऐवज तसेच काही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेस जप्त केली होती. दरम्यान, याप्रकरणी एटीएसने बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) अधिनियम १९६७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा नोंद करून एटीएसने पुढील तपास सुरू केला होता. यादरम्यान कागदपत्रे आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तपासणी केली होती.
छापेमारीची केली गेली कारवाई
केंद्रीय तपास यंत्रणेकडून या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. सोबतच राज्य दहशतवाद विरोधी पथकही तपास करत होते. यात पकडलेल्या आरोपीकडून पुणे व पिपरी-चिंचवडमधील काहींची नावे समोर आली. तर, काही संशयास्पद हालचालीबाबत माहिती खडकी, वानवडी व पिंपरी-चिंचवडमधील भोसरी भागात 19 ठिकाणी छापेमारी केली. छापेमारीत आक्षेपार्ह गोष्टी, पुस्तक, कागदपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस जप्त करण्यात आले होते.
कोथरूड परिसरातून तिघांना पकडले
पुणे पोलिसांनी वाहन चोरीच्या संशयावरून कोथरूडमध्ये तिघांना पकडले होते. तपासात ते दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर देशातील तपास यंत्रणांकडून याप्रकरणाचा तपास सुरू होता. पसार झालेल्या एका दहशतवाद्याला दिल्लीत पकडले होते. हे दहशतवादी आयसीस संघटनेशी संबंधित असल्याचे उघडकीस आले होते.