दारू न पाजल्याने व्यक्तीवर चाकूहल्ला
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात सलग तीन दिवस तगादा लावूनही दारू न पाजल्याने एकावर चाकून हल्ला करण्यात आला. संबंधित तरुणाच्या चक्क पृष्ठभागावर चाकूने वार करून जखमी करण्यात आले. ही घटना बुधवारी (दि. ६) रात्री ११ वाजताच्या सुमारास स्थानिक मिलिंद नगर येथे घडली.
गौरव नरेश येंडे (वय २६, रा. ज्ञानेश्वर नगर, म्हसाळा) असे जखमीचे नाव आहे. गौरव येंडे हा ऑटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. तो सेवाग्राम येथील रुग्णालय ते वर्धा शहर अशी प्रवाशांची ने-आण करतो. त्याला मिलिंदनगर येथे राहणाऱ्या कार्तिक ढोके याने सलग तीन दिवस दारू पाजण्यासाठी तगादा लावला. पण गौरवने दुर्लक्ष केले. अशातच गौरव हा प्रवासी घेऊन मिलिंद नगर येथे गेला. परतीच्या प्रवासादरम्यान तो महिलाश्रम परिसरात थांबला.
हेदेखील वाचा : Akola News: नवविवाहित तरुणाला प्रेयसीनं पळवलं, लग्नाला केवळ दोन महिनेच झाले होते; अकोल्यातील धक्कादायक प्रकार
याच ठिकाणी कार्तिक ढोके याने ‘तू मला दारू पाजली नाही’, असे म्हणत वाद घालत गौरवच्या पृष्ठभागावर, मांडीवर चाकूने वार करून जखमी केले. या प्रकरणी गौरव येंडे याच्या तक्रारीवरून वर्धा शहर पोलिस ठाण्यात कार्तिक ढोके याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.
दारूसाठी पैसे नाही म्हणताच भोकसली चावी
दुसऱ्या एका घटनेत, दारूसाठी पैशाची मागणी करण्यात आली. पैसे नाही असे म्हणताच तिघांनी संगनमत करून एकाला दुचाकीच्या चावीने मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. ६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास हिंगणघाट येथील संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथे घडली. प्रवीण विनायक हिंगे (रा. संत ज्ञानेश्वर वॉर्ड, हिंगणघाट) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी जखमी प्रवीण हिंगे याच्या तक्रारीवरून राकेश बंडू राठोड व त्याच्या दोन साथीदार (तिन्ही रा. हिंगणघाट) यांच्याविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.