
ब्रोकर असल्याचे सांगत उकळले ६५ लाख
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात फसवणुकीच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना नाशिकमध्ये आता कमी गुंतवणुकीत अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी काही गुंतवणुकदारांची तब्बल ६५ लाख ४४ हजार ८३७ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सदर फसवणुकीचा प्रकार ३० जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडला. अज्ञात व्यक्तींनी व्हॉटसअॅपवर तसेच मोबाईलवर संपर्क करून ऑनलाईन शेअर मार्केटचे आमिष दाखवले. यास बळी पडलेल्या फिर्यादीसह अन्य गुंतवणुकदारांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून घेण्यात आले. या ग्रुपमध्ये शेअर मार्केट, ऑनलाईन ट्रेडिंग व क्रिप्टो गुंतवणुकीबाबत आकर्षक पोस्ट, स्क्रीनशॉट व नफ्याचे दाखले टाकले जात होते. सुरुवातीला कमी रकमेची गुंतवणूक करून थोडा परतावा दाखवण्यात आल्याने व तक्रारदाराचा विश्वास दृढ झाला. मोठी गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल, असे सांगत आरोपींनी वेगवेगळ्या टप्प्यांत मोठ्या रकमा त्यांना देण्यास प्रोत्साहित केले.
दरम्यान, एकूण ६५ लाख ४४ हजार ८७३ रुपये विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर तक्रारदाराने या रकमेसह दिसणारा कोट्यवधी रुपयांचा नफा खात्यातून काढण्याची प्रक्रिया केली. पण, त्यात अडचणी आल्या. फिर्यादीने आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. यानंतर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
सायबर पोलिसांचे आवाहन
अनोळखी लिंक व अॅपवर गुंतवणूक करू नका. गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय उपलब्ध आहेत. ते ही समजत नसतील तर जवळच्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधा. व्हॉट्सअॅप/टेलिग्राम ग्रुपमधील सल्ल्यावर विश्वास ठेवू नका. अधिकृत सेबी नोंदणीकृत प्लॅटफॉर्मचीच खातरजमा करा. खात्रीशीर नफा असे दावे करणाऱ्यांपासून सावध राहणे गुंतवणुकदारांच्या फायद्याचे आहे. संशयास्पद व्यवहार आढळल्यास १९३० सायबर हेल्पलाईन किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेदेखील वाचा : ज्यादा परताव्याच्या आमिषाने दीड कोटींना गंडा; सायबर चोरट्यांनी फसवणूक केली अन् तेच पैसे…