
TET च्या तणावातून विवाहितेची आत्महत्या? कुटुंबियांचा सासरच्यांवर गंभीर आरोप
कुरुंदवाड : आर्दशनगर येथे टीईटी परीक्षेच्या अभ्यासावरील ताणातून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२०) रात्री घडली. कौसर इंजमामउलहक गरगरे (वय २७, रा. आर्दशनगर, कुरुंदवाड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर माहेरच्या नातेवाईकांकडून मोठा तणाव निर्माण झाला.
आपल्या मुलीचा मृतदेह पाहताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून परिसरातील नागरिकांनाही अश्रू अनावर झाले होते. पती इंजमामउलहक राजमहंमद गरगरे (वय ३१) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, रात्री सुमारे अकराच्या सुमारास कौसर यांनी टीईटी परीक्षेचा अभ्यास मनासारखा न झाल्याने त्या मानसिक तणावाखाली राहत्या घरातील बेडरूममध्ये लोखंडी हुकास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे म्हटले आहे.
हेदेखील वाचा : Delhi Metro Suicide : सांगलीच्या दहावीच्या मुलाची दिल्ली मेट्रो स्टेशनवरुन उडी; धक्कादायक सुसाईड नोट लिहित संपवले जीवन
दरम्यान, घटनेनंतर उशिरापर्यंत वडील इकबाल औटी, भाऊ अल्ताफ औटी, असलम औटी, शकील औटी यांच्यासह माहेरच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी करत ‘आमच्या मुलीचा घातपात झाला आहे, आमच्या मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले’ असल्याचा आरोप करत पती, सासू व सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी करत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, “गुन्हा नोंद झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही” या नातेवाईकांच्या भूमिकेमुळे परिसरात तणाव वाढला.
परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, सरफराज जमादार, नजीर मखमला, बबलू हुकिरे, सादिक बागवान यांनी मध्यस्थी करून नातेवाईकांशी समुपदेशन केले. “मृतदेहाची विटंबना होऊ देऊ नका, पोलिस प्रशासन योग्य सहकार्य करेल,” असे सांगत त्यांनी स्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास तयार झाले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी, “शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे सांगितले. अखेर दफनविधी पार पडला. या विवाहितेला एक वर्षाची मुलगी असून विवाहितेने घेतलेल्या या निर्णयामुळे परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे.