दोन लाख रूपयांसाठी विवाहित महिलेचा छळ
छत्रपती संभाजीनगर : माहेरहून दोन लाख रुपये आणि एसी घेऊन ये असा तगादा लावत विवाहितेचा छळ करण्यात आला. तसेच गर्भवती असताना गर्भलिंग तपासणीसाठी दबाव टाकण्यात आला. ही घटना १० डिसेंबर २०२३ ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान शहा बाजार, चंपा चौक येथे घडली.
याप्रकरणी पती सलमान खान (वय ३२), सासू नसरिन बेगम खान (वय ७१), नणंद शहाना खान (वय ४५), शाईस्ता खान (वय ४०), निलोफर खान (वय ३५), आयशा खान (वय ३३), सायमा खान (वय २९) असे विवाहितेचा छळ करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात २२ वर्षीय पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेचा विवाह सलमान खान (वय ३२) याच्याशी ६ ऑक्टोबर २०२३ रोजी झाला. लग्नावेळी माहेरकडील नातेवाईकांनी सासरी उपयोगी वस्तू व अन्य सामान दिले होते.
हेदेखील वाचा : घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
दरम्यान, लग्नानंतर पहिल्या महिन्यात सासरच्यांकडून चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर सर्व आरोपींनी फिर्यादीला माहेरून दोन लाख रुपये आणि ए.सी. घेऊन ये असा तगादा लावून मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. तसेच फिर्यादी गर्भवती असताना तिच्याकडून गर्भलिंग निदान करण्याचा दबाव टाकण्यात आल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास हवालदार दराडे करत आहेत.
हेदेखील वाचा : ‘माहेरहून 20 लाख रुपये घेऊन ये’ म्हणत विवाहितेचा छळ; भूलथापा देऊन माहेरी पाठवलं अन्…
घर बांधण्यासाठी पैशांसाठी विवाहितेचा छळ
दुसऱ्या एका घटनेत, घर बांधण्यासाठी तुझ्या बापाकडून दोन लाख रुपये आण म्हणत विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. शहरातील इदगाह मोहल्ला भागातील मुलीचे लग्न बीड येथील इम्रान इब्राहीम खान (रा. इस्लामपुरा, बीड) याच्यासोबत २० ऑक्टोबर २०१९ रोजी मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे संसारोपयोगी सर्व वस्तू देऊन झाले होते. तरीही नंतर छळ करण्यात आला.