
पुणे रेल्वे स्थानकावर ३.४२ कोटींचे एमडीएमए, क्रिस्टल मेथ जप्त; आंतरराष्ट्रीय तस्करीचे रॅकेट उघडकीस
लालरे मलियानी (वय ३२, रा. रामह्लून, ऐझॉल, मिझोराम) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी पुणे रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यातील कलम २२(सी), २८, २९ आणि ३० सह कलम ८(सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhayandar Crime: भाईंदरमध्ये किरकोळ वादातुन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
डीआरआयच्या अधिकाऱ्यांना एका महिलेकडून रेल्वेच्या माध्यमातून एमडीएमए आणि अॅम्फेटामाइनसारखे मनोविकारावर परिणाम करणारे अमली पदार्थ वाहून नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. संबंधित महिला दिल्लीतील हजरत निजामुद्दीन येथून म्हैसूरकडे जाणाऱ्या स्वर्ण जयंती एक्स्प्रेसच्या ए-१ डब्यातून प्रवास करत होती.
माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर सापळा रचला. रेल्वे स्थानकात दाखल होताच अधिकाऱ्यांनी लालरे मलियानी हिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात नेण्यात आले. राजपत्रित महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत तिच्या सामानाची झडती घेतली असता अमली पदार्थ आढळून आले.
महिलेच्या बॅगेतील एका पाऊचमध्ये दोन तपकिरी रंगाच्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या. त्यामध्ये रंगीत गोळ्या होत्या. याशिवाय आणखी पाच पाऊचमध्ये स्फटिकासारखा पदार्थ सापडला. नार्कोटिक्स डिटेक्शन किटद्वारे तपासणी केली असता रंगीत गोळ्या एमडीएमए, तर स्फटिकासारखा पदार्थ अॅम्फेटामाइन अर्थात क्रिस्टल मेथ असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीत लालरे मलियानी हिने हे अमली पदार्थ ‘अशिमा’ नावाच्या आफ्रिकन व्यक्तीच्या सांगण्यावरून घेऊन जात असल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. अशिमाने तिचे रेल्वे तिकीट आणि बॅगची व्यवस्था केली होती. म्हैसूरला पोहोचल्यानंतर लोकेशन शेअर करण्याच्या सूचना तिला देण्यात आल्या होत्या. त्यानंतर संबंधित व्यक्ती तिच्याशी संपर्क साधून बॅग ताब्यात घेणार असल्याचे तपासात समोर आले आहे.
Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल
लालरे मलियानीच्या मोबाईलमधून अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटसंदर्भात महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे डीआरआयने सांगितले. ती आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या संघटित रॅकेटचा भाग असल्याचा संशय आहे.
आरोपीला पुण्यातील विशेष एनडीपीएस न्यायालयात हजर करण्यात आले. डीआरआयच्या वतीने विशेष सरकारी वकील ऋषिराज वालवेकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या तस्करीच्या नेटवर्कमधील अन्य व्यक्ती, अमली पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता, त्यांची वाहतूक कशी केली जात होती तसेच या रॅकेटचे आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचा डीआरआयकडून सखोल तपास सुरू आहे.