पीडित अल्पवयीन मुलगी ७ महिन्यांची गरोदर
कुरुंदवाड : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले. असे असतानाही संबंधित मुलगी 7 महिन्यांची गरोदर असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून सदर पीडित मुलगी जिल्हा बाल कल्याण समितीच्या देखरेखीखाली असूनही हा प्रकार घडल्याने संस्थेवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे.
२५ नोव्हेंबर २०२४ रोजी पीडित मुलीचा बालविवाह झाल्याची निनावी तक्रार जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयातील चाईल्ड केअर संस्थेकडे प्राप्त झाली होती. यावरून केअर संस्थेने तत्काळ संबंधित गावच्या ग्रामसेवकाला मुलगी हजर करण्याचे आदेश दिले. त्यावेळी नातेवाईकांनी फक्त साखरपुडा झाला असून, लग्न झाले नसल्याचे सांगितले. संस्थेने पुढील कारवाई म्हणून पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना दर महिन्याला जिल्हा बालकल्याण समितीकडे हजेरी लावण्याचे आदेश दिले होते.
गेल्या आठवड्यात हजेरीसाठी पीडित मुलगी आणि तिचे नातेवाईक बालकल्याण समितीत आले असता तिच्या शारीरिक स्थितीबाबत संशय निर्माण झाला. वैद्यकीय तपासणी केली असता ती सुमारे सात महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत तिचा खरोखरच विवाह झाला असल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या पती प्रथमेश परशराम कांबळे यांच्या विरुद्ध कायद्यांतर्गत बाललैंगिक अत्याचार व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुलाचे वडील परशुराम दशरथ कांबळे व आई ज्योती परशुराम कांबळे आणि मुलीचे आई-वडील यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नवऱ्या मुलाला अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून अल्पवयीन मुलगीची जिल्हा बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली असूनही तिच्या गरोदरपणाची कोणतीही माहिती संस्थेला न मिळाल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.