
मीरा भाईंदर : पेणकर पाडा परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून, परिसरातील अट्टल गुन्हेगार ‘सोन्या’ नामक व्यक्ती सार्वजनिक बाथरूममध्ये अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे दिसून आले. व्हिडिओ समोर येताच विभागातील समाजसेविका श्वेता पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. तेथे पोहोचताच आरोपीकडून अंमली पदार्थाच्या पुड्या, इंजेक्शन्स व संशयास्पद साहित्य मिळाल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित आरोपी हा तडीपार गुन्हेगार असूनही पुन्हा परिसरात हजेरी लावून मोकाटपणे बेकायदेशीर कृत्ये करीत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या मते, वारंवार तक्रारी देऊनही अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई न होत असल्याने पोलिसांचा कामचुकारपणा उघड झाला आहे. परिसरात अमली पदार्थांचा वाढता वापर आणि गुन्हेगारीचा वाढता क्रम पाहता नागरिकांनी तातडीने कठोर पोलिस कारवाईची मागणी केली आहे.समाजसेविका श्वेता पाटील यांनी पोलिस प्रशासनाला अशा गुन्हेगारांविरोधात त्वरित कठोर कार्रवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर रूप धारण करेल, असे सांगितले.पेणकर पाडा परिसरातील वाढत्या अमली पदार्थांच्या समस्येमुळे स्थानिकांनी प्रशासनाकडे सुरक्षित वातावरणाची मागणी अधिक जोरदारपणे मांडली आहे.
मीरा भाईंदरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत जात असल्याचं दिसून येत आहे. याआधी देखील मीरा-भाईंदर-वसई विरार गुन्हे शाखा (कक्ष-4) यांनी तेलंगणातील चेरापल्ली परिसरात एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ बनविणारा कारखाना उद्ध्वस्त करून मोठा गुन्हेगारी पर्दाफाश केला. या कारवाईत कारखाना मालक श्रीनिवास विजय वोलेटी व त्याचा साथीदार तानाजी पंढरीनाथ पटवारी यांना अटक करण्यात आली आहे. या ठिकाणाहून 5 किलो 790 ग्रॅम एमडी, 35,500 लिटर रसायन, 950किलो पावडर व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार याची किंमत तब्बल 12हजार कोटी रुपये एवढी होते.
शहरात अंमली पदार्थ विक्रीविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत नवघर पोलीस ठाणे यांनी 251ग्रॅम वजनाचा एम.डी. मॅफेड्रॉन जप्त केला होता. याची किंमत सुमारे 1,255,000 इतकी होती. या प्रकरणात साहिल विजय सिंग या 20 वर्षीय तरुणाला मीरारोड येथून पोलीसांनी अटक केलीआली आहे. ही कारवाई दि.2 सप्टेंबर रोजी भाईंदर पूर्व येथील नवघर फाटक सबवे जवळ करण्यात आली.तपासणीदरम्यान आरोपीकडे डी. मॅफेड्रॉनचा मोठा साठा सापडला होता.