भाईंदर/ विजय काते: भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाईने गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव रितिक चौहान असून मूळचे नाशिकचे होते. २०२३ त्यांची पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली. सध्या त्यांची नेमणूक भाईंदर पोलीस ठाण्यात होती. भरतीनंतर भाईंदर पश्चिमेतील बेकरी गल्ली येथे आपल्या आईसोबत भाडेतत्त्वावर राहत होते.
प्राथमिक माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांची आई काही कामानिमित्त गावी गेली होती. गुरुवारी सकाळी त्याने घरातच गळफास घेतल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या म्हणण्यानुसार पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलीस दलात रुजू असलेल्या या शिपायाने आत्महत्या करण्याचं नक्की कारण काय किंवा कोणाच्या दबावाखाली येऊन हे कृत्य केलं आहे का? खरंच ही आत्महत्या आहे की आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं आहे, याबाबत प्राथमिक तपास पोलीसांकड़ून जारी आहे.