100 एकर शेत धुंडाळूनही सापडेना गाडेचा मोबाईल; घराची झडती घेत...
पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर संतापाची लाट उसळली आहे. या अत्याचारप्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक त्याच्या गुनाट गावी घेऊन गेले होते. गाडे फरार झाल्यानंतर लपलेल्या ठिकाणी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत त्याचा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, शंभर एकर शेत धुंडाळून देखील गाडेचा मोबाईल सापडला नाही.
दत्तात्रय गाडे याच्या घराची झडतीही घेण्यात आली. त्यात पोलिसांनी सहा जणांचे जबाब देखील नोंदवले. सात ते आठ अधिकारी आणि अंमलदार असा 40 ते 45 जणांचा ताफा गुनाट गावात दाखल झाला होता. स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास स्वारगेट पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सोमवारी वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर तपासाची दिशा निर्धारित करण्यात आली होती. त्यानुसार, गाडेला घेऊन शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक गुनाट गावात दाखल झाले होते. गुन्हा केल्यानंतर सर्वप्रथम गाडे कुठे गेला, कसा गेला, तो कुठे कुठे लपून बसला होता. त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली का? याचा तपास गुन्हे शाखा करत आहे.
गुन्हे शाखेने गाडे गुनाट गावात लपलेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्याचबरोबर त्याच्या मोबाईलचा शंभर एकराच्या शेतात दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेतला. मात्र, मोबाईल मिळून आला नाही. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असलेल्या सहा व्यक्तींचा जबाब नोंदवला. फरार कालावधीत गाडेने पाणी मागितलेल्या, जेवण मागितलेल्या, त्याचबरोबर गॅरेजवाला अशा लोकांचा यामध्ये समावेश आहे. गुन्हे शाखेने गाडेच्या घराची झडती घेऊन पंचनामा केला.
आरोपपत्र दाखल करण्याचे नियोजन
या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. अखेर पुणे पोलिसांनी या नराधमला बेड्या ठोकल्या आहेत. अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुढील १५ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे.