सोन्याचे दागिने चोरले, नंतर गळा दाबून मृतदेह ड्रेनेज...; 76 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या (फोटो सौजन्य-X)
Mumbai Crime News in Marathi: मुंबईतील काशीमिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चार दिवसांपूर्वी हरवलेले ७५ वर्षीय विठ्ठल तांबे यांचा मृतदेह अखेर एमआयडीसी रोडवरील नमस्कार हॉटेलजवळील नाल्यात सापडला. सोन्याच्या लालसेपोटी एका 76 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
१५ सप्टेंबर रोजी तांबे हे घराबाहेरून रहस्यमयरीत्या गायब झाले होते. कुटुंबीयांनी १६ सप्टेंबर रोजी काशीमिरा पोलिसांकडे मिसिंगची नोंद केली होती. पोलिस हवालदार दिनेश भोर हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत होते. मात्र, मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत, योग्य वेळी शोधमोहीम न राबवल्याने ही घटना उशिरा उघडकीस आल्याचे सांगितले.
मृतदेहाची स्थिती पाहता, विठ्ठल तांबे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातातील अंगठी गायब असल्याचे लक्षात आले असून, लूटमार करून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपास अधिक खोलात गेल्यावर उघड झाले की आरोपीने हत्या केल्यानंतर मृतदेह सलूनमधून बाहेर ओढून नेला आणि तो जवळच्या ड्रेनेजमध्ये फेकून दिला होता, जेणेकरून त्याचा कोणताही ठावठिकाणा लागू नये. या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत सलून चालकाला अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचीही चौकशी केली जात आहे.
या घटनेचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये मृतक तांबे हे एका सलूनमध्ये जाताना दिसले. त्यानंतर काही तासांतच सलून मालक स्वतः मृतदेह मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या गटाराच्या चेंबरमध्ये टाकताना दिसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संबंधित सलून मालकाला तात्काळ ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीतून लूटमार करून खून केल्याची शक्यता बळावली असून, अन्य कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेनंतर तांबे कुटुंबीय शोकाकुल झाले असून त्यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वृद्ध व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.