पदवी नसताना औषधांची विक्री करणं आलं अंगलट; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल (File Photo : Fraud)
इचलकरंजी : महानगरपालिका आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी न घेता तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अथवा प्रमाणपत्र नसताना औषधांची विक्री केल्याप्रकरणी गावभाग पोलिसात तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली.
उचगांव (ता. करवीर) येथील रत्नोत्रय आयुर हेल्थ केअरच्या आरोग्य सल्लागार गणेश शशिकांत बारटक्के, हेल्थ अॅडवायझर रवीराज रामचंद्र कवाळे, तेजस वीरुपाक्ष जंगम, वनिता अशोक पोवार, तंझीला तौफिक रुकंदे, सायली शुभम पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी इचलकरंजी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी फिर्याद दिली आहे.
हेदेखील वाचा : OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
शहरातील पी. बा. पाटील मळा परिसरात वैद्यकीय परिषदेचे प्रमाणपत्र अथवा वैद्यकीय पदवी नसताना पाच ते सहाजण महानगरपालिकेकडून आल्याचे सांगत होते. हे सर्वजण घरोघरी जाऊन रत्नोत्रय आयुर हेल्थ केअर अशा आशयाची 20 रुपयांची पावती करुन त्यांच्याकडील यंत्राद्वारे महिलांची तपासणी करत. त्यानंतर काही औषधे देत असल्याची माहिती महानगरपालिकेला मिळाली होती. त्यानुसार, संगेवार, संभाजी पवार, फार्मासिस्ट शुभम भोसले, अमृत बिळगीकर आदींनी पी. बा. पाटील मळा येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
या भागातील महिलांकडून माहिती जाणून घेतली असता उपरोक्त नमुद व्यक्तींकडून 20 रुपयांची पावती करुन रत्नलीव सिरप, दिव्या अमृत, दिव्या आरोग्य, रत्न संजीवन, रत्न फेम सिरप, नारी सखी सिरप, अर्थोरत्न सिरप, पेनोरिल सिरप, त्रिफला टॅब्लेट, सुवर्णप्राश ड्रॉप, अर्थोरत्न टॅब्लेट अशी 3 हजार 310 रुपयांची औषधे देत असल्याचे सांगितले. त्यावर त्या व्यक्तींचा शोध घेता गणेश बारटक्के, रवीराज कवाळे, तेजस जंगम, वनिता पोवार, तंझीला रुकंदे व सायली पाटील हे गळ्यात ओळखपत्र अडकवून फिरत असल्याचे मिळून आले.
चौकशी करताच फुटले बिंग
दरम्यान, याची चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र, वैद्यकीय पदवी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना गावभाग पोलिस ठाण्यात आणून सहा जणांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.