अकलूजच्या गणेशगावमध्ये शेतकऱ्याची निर्घृण हत्या; डोकं, तोंडासह पायावरही धारदार हत्याराने केले वार
अकलूज : गणेशगाव (ता.माळशिरस, जि. सोलापूर) येथील शेतकरी सिनाप्पा व्यंकू वाघमोडे (वय अंदाजे ६०) यांची अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी रात्री हल्ला करून निर्घृण हत्या केली. रात्रीच्या वेळी आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सिनाप्पा यांच्या डोक्यावर, तोंडावर, हातावर व पायावर धारदार हत्याराने वार केले आहेत.
सिनाप्पा वाघमोडे यांच्या बंगल्याचे बांधकाम गणेशगाव येथे सुरु आहे. अर्धवट अवस्थेतील बांधकामात सिनाप्पा रात्री झोपले होते. रात्रीच्या वेळी आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सिनाप्पा यांच्या डोक्यावर, तोंडावर, हातावर व पायावर धारदार हत्याराने वार केले. या हल्ल्यात सिनाप्पा यांचा झोपलेल्या जागेवरच मृत्यू झाला. सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा बांधकामावर आला, तेव्हा त्याला झालेल्या प्रकाराची माहिती मिळाली. सकाळी सातच्या सुमारास अकलूज पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
हेदेखील वाचा : “CM देवेंद्र फडणवीस निकटवर्तीय तेजस मोरे यांच्या सुपेकर कनेक्शमुळेच…”; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
सिनाप्पा यांचा मृतदेह अकलूज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. सोलापूरहून आलेल्या फोरेन्सिक टीमने तपासणी केली. श्वान पथकाच्या सहाय्याने शोध घेतला असता श्वान घराच्या पाठीमागील शेतामध्ये घुटमळत होता. हल्लेखोरांनी अत्यंत अमानुष व क्रूरपणे सिनाप्पा यांच्यावर वार केले आहेत. दरम्यान, अकलूज पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते.
50 रुपयांच्या उधारीवरून एकाची हत्या
राज्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. गुन्हेगारीचं सत्र सुरु आहे. आता लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरमध्ये केवळ ५० रुपयांच्या उधारीच्या मागणीवरून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी, विवेकानंद चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, लातूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या किरकोळ उधारीमुळे घडलेल्या घटनेने लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.