राजू शेट्टी यांचा फडणवीस यांच्यावर आरोप (फोटो -टिम नवराष्ट्र)
इचलकरंजी : राज्याच्या कारागृह घोटाळ्यातील प्रमुख तत्कालीन अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता व कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे अनेक कारनामे उघडकीस आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जाणा-या तेजस मोरे यांच्यासोबत सुपेकरांचे कनेक्शन असल्याने यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारागृह घोटाळ्याच्या प्रकरणावर पांघरूण घालत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
राज्यातील कारागृहात तीन वर्षात जवळपास पाचशे कोटीचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री , मुख्य सचिव व गृह सचिव यांचेकडे सदर प्रकरणाची चौकशी करण्याची लेखी मागणी केली होती. गत आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री यांना या प्रकरणावर भेटीसाठी वेळ मागितला असता त्यांनी भेट देण्यास टाळाटाळ केली आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव व गृह सचिव यांना भेटले असता चौकशी सुरू असल्याचे सांगून सध्या हे प्रकरण वरिष्ठ पातळींवर असल्याने आपण त्यांच्याकडे पाठपुरावा करावा असे सांगण्यात आले. सध्या राज्याच्या प्रशासनात मुख्य सचिव यांच्यानंतर मुख्यमंत्री हेच राज्याचे प्रमुख व वरिष्ठ असून त्यांनी या घोटाळ्याची चौकशीबाबत टाळाटाळ करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे वाटू लागले आहे.
Jalindar Supekar : आता दिवाळी घोटाळा…; जालिंदर सुपेकरांचा आणखी एक प्रताप राजू शेट्टींनी केला उघड
सदर प्रकरणाची गेल्या तीन महिन्यात सखोल चौकशी होणे गरजेचे होते. कारागृहात झालेल्या कॅंन्टीन , रेशन व इतर साहित्य उपकरणाच्या खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कारागृह घोटाळ्यातील प्रमुख अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांच्याशी तेजस मोरे यांचेही नाव सुपेकर यांच्यासोबत काढलेल्या फोटोवरून चर्चेत आले आहे. तेजस मोरे हा गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने मुंबई भायखळा येथील एडीजी कार्यालयात तसेच अधिका-यांच्या बंगल्यावर त्याचा संपर्क वाढलेला दिसून येत आहे.
तेजस मोरे हा कोणताही अधिकारी नसून अथवा कोणताही ठेकेदार नसूनही कारागृहातील वरिष्ठ अधिकारी यांना हाताशी धरून प्रशासनातील अनेक कामे मार्गी लावण्याचे काम करत असल्याचे समजते. तेजस मोरे याच्यावर याआधी ४०९ , ४२० सारखे फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले असतानाही सरकारचा जावई असल्यासारखा त्याचा मंत्रालयात वावर असतो. ज्या मंत्रालयामध्ये प्रवेश करत असताना आमदार खासदार यांचे ओळखपत्र तपासले जाते त्या ठिकाणी तेजस मोरेच्या MH-01-EJ-2707 या त्याच्या गाडीला कोणतीही तपासणी व पाहणी न करता प्रवेश दिला जातो.
हगवणे कुटुंब देत होतं सुनांना IG मामांची धमकी? महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांनी स्पष्टच सांगितलं
यापुर्वीही बांधकाम कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव , रायसोनी पतसंस्थेतील १२०० कोटीचा घोटाळा करणारे मुख्य संशयित आरोपी सुनिल झंवर , यांच्यासारख्या गंभीर गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या लोकांना अभय देत राज्याचे मुख्यमंत्री गैरकारभारावर पांघरून घालत आहेत. कारागृह घोटाळ्याची चौकशी करण्याची मुख्यमंत्री यांच्यामध्ये हिम्मत असेल तर तत्कालीन अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता , जालिंदर सुपेकर तसेच पुणे या कार्यालयातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी सत्यवान हिंगमिरे ,तुरूंग अधिक्षक प्रशांत मत्ते, जेलर शाहू विभूषण दराडे , लेखनिक गौरव जैन ,सुनील ढमाळ अधीक्षक येरवडा ,अतुल पट्टेकरी क्लार्क येरवडा कारागृह या सर्वांची तसेच त्यांच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआय कडून चौकशी करण्यात यावी. अशीही मागणी शेट्टीं यांनी केली .